Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:48 PM2018-09-27T19:48:12+5:302018-09-27T21:41:03+5:30
पानशेत पुरासारखीच परिस्थीती अाज निर्माण हाेते की काय अशी शंका दांडेकर पूल वसाहत येथील रहिवाशांच्या मनात निर्माण झाली हाेती.
पुणे : पानशेत धरण फुटल्यानंतर सर्व पुणे पाण्याखाली गेलं हाेतं. ज्याला अापण जीवन म्हणताे, त्यानेच राैद्र रुप धारण केल्यास काय हाेऊ शकतं याची अनुभती त्यावेळी पुणेकरांना अाली हाेती. तशीच परिस्थीती अाज निर्माण हाेते की काय अशी दांडेकर पूल वसाहत येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली हाेती. येथे राहणारे वसंत भाेसले यांना सकाळी कालवा फुटून घरात पाणी शिरल्याचा फाेन अाला अन ते हातातलं काम साेडून ते घराकडे धावत सुटले. परंतु ताेपर्यंत पाण्याने करायचे ते काम केले हाेते.
अाज सकाळी मुठा कालवा फुटल्याने पुण्यातील दांडेकर पूल वसाहतीत लाखाे लीटर पाणी शिरले. कष्टकऱ्यांचा हा भाग असल्याने पै पै जमवून संसार त्यांनी उभा केला हाेता. अापल्या डाेळ्यासमाेर ताे वाहून जाताना पाहून त्यांच्या डाेळ्याच्या कडा पाणवत हाेत्या. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे हाेत्याचे नव्हते झाले. दांडेकर पूल वसाहतीत राहणारे वसंत भाेसले सकाळीच कामावर गेले हाेते. राेजच्याप्रमाणे अाजही त्यांनी अापल्या कामाला सुरुवात केली हाेती. काही वेळातच पत्नीचा फाेन त्यांना अाला. कामावर येऊन फारसा वेळ झालेला नसताना लगेचच पत्नीचा फाेन अाल्याने काहीतरी घडलं की काय अशा संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्यांनी ताे फाेन घेतला अाणि त्यांची शंका खरी ठरली. पाण्याच्या जाेरदार वेगामुळे भाेसले यांच्या घराची भिंत काेसळली हाेती. घरी त्यांची पत्नी अाणि मुले असतात. मुले शाळा, क्लासला गेल्याने पाणी घरात शिरले तेव्हा घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने पाण्याने केलेला हाहाकार अापल्या डाेळ्याने पाहिला. भाेसले यांनी घरी येऊन पाहिलं असता त्यांच्या घरातील सामान वाहून गेले हाेते. त्यांचा संसार उघड्यावर पडला हाेता.
भाेसले यांच्याप्रमाणेच अनेकांवर माेठे संकट काेसळले हाेते. याच भागात राहणाऱ्या एक अाजी घरातील सर्व मंडळी अापअापल्या कामाला गेल्याने घराच्या समाेरच्या महिलेकडे गप्पा मारण्यास गेल्या हाेत्या. त्यांच्या गप्पा चालू असताना अचानक काहीजण पाणी येतंय असे अाेरडत पळत हाेते. काही कळायच्या अात कंबरे एेवढ्या पाण्याने घर व्यापून गेले. सुदैवाने घरात छाेटासा लाेखंडी जिना असल्याने अाजी व घरातील महिला या जिन्यावर चढल्या. घरातील सामान पाण्यात वाहू लागले. मदतीसाठी या महिला हाक देऊ लागल्या. काही वेळात येथील स्थानिक तरुणांनी त्यांना पत्रा उचकटून बाहेर काढले. याच पद्धतीने या तरुणांनी अनेकांची या प्रलयातून सुटका केली. पाणी अाेसरल्यानंतर अनेकांच्या घरात केवळ पाणी अन चिखल इतकेच उरले हाेते.