Mutha Canal : पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवत मुक्ता टिळकांचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:18 PM2018-09-27T15:18:58+5:302018-09-27T15:27:29+5:30
मुठा नदीचा कालवा फुटल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे- मुठा नदीचा कालवा फुटल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दांडेकर पूल, सिंहगड रोड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जात असल्यानं या परिसरातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. मुठा नदीचा कालवा फुटल्यानं पुणे महापालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. परंतु पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक या प्रकाराला पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं आहे.
त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. महापौर मुक्त टिळक म्हणाल्या, सकाळी 11 वाजता हा कालवा फुटला, त्यानंतर लगेच अग्निशामक दलाचे जवान आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. कुठल्याही एका व्यक्तीची किंवा संस्थेची ही जबाबदारी नाही. यातल्या गंभीर बाबींकडे संबंधित विभागांनी लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या काळात दोषींवर कारवाई करण्यात येईल.
या प्रकाराची पाटबंधारे विभागाला सूचना दिली असून, आता डॅमेज कंट्रोल महत्त्वाचं आहे. पाणी शिरल्यानं अडकून पडलेल्या महिला, वृद्ध, लहान मुलांना बाहेर काढलं आहे. तसेच या पुराच्या पाण्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेची काळी घेतली असून, महापालिकेच्या अखत्यारितील सर्वतोपरी उपाययोजना करू, असंही मुक्ता टिळक म्हणाल्या आहेत.