Mutha Canal : जलतांडवाने आक्रोश, संसार उद्ध्वस्त, अनेकांचे सर्वस्व नेले हिरावून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:51 AM2018-09-28T00:51:00+5:302018-09-28T01:15:20+5:30
सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले.
पुणे : सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही काळानंतर, ते पाणी सिंहगड रस्त्यावर आले. तोपर्यंत त्या पाण्याने झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांचे सर्वस्व हिरावून नेले होते.
एरवी नेहमी रहदारीमुळे गर्दी असलेल्या दांडेकर पुलावर मात्र पुढील काही वेळातच शुकशुकाट पसरला. एव्हाना पाणी सिंहगड रस्त्यावर येऊन पोहोचले होते. अचानक आलेल्या याप्रकारच्या संकटामुळे सर्वजण भेदरलेल्या अवस्थेत होते. त्या वेळी काय करावे, त्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जावे हेच त्यांना सुचेनासे झाले. वेळच तशी होती की कालव्यातील पाण्याने त्यांना त्या भयाण संकटातून सुटकेकरिता विचार करण्याची कुठलीच संधी दिली नाही. घरात संसारापयोगी म्हणून जे काय होतं ते सगळं त्या पाण्याने आपल्यासोबत वाहून नेलं. यानंतर मागे उरला आकांत आणि आक्रोश.
पाण्याचा प्रचंड लोंढा झोपडपट्टीत शिरता क्षणीच घरातील महिलांनी आरडाओरड केली. पुरुषमंडळी सकाळीच कामानिमित्त बाहेर पडले होते. तर मुले शाळेत गेलेली. एकीकडे संसार पाण्याबरोबर वाहून गेला असला, तरी आपली मुलं मात्र सुरक्षित राहिल्याने महिलांनी देवाचे आभार मानले. कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे असे कळताच पुरुषांनी तातडीने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. त्या पाण्याने आपल्या सोबत वाहून नेण्याचे काहीच शिल्लक ठेवले नव्हते. कष्टकºयांच्या नशिबी अशा परीक्षा कायमच येत असतात. यावेळीही निर्दयी नियतीने तेच केले.
नाल्यामध्ये पाणी वळल्याने विध्वंस टळला
कालवा ज्याठिकाणी फुटला त्याच्या जवळून एक नाला वाहतो. त्यामुळे कालव्यातून वेगाने आलेले पाणी या नाल्यातून पुढे सिंहगड रस्त्यापर्यंत आले. हा नाला रस्त्याच्या खालून पुढे दांडेकर पूल वसाहतीतून जात आंबिल ओढ्याला मिळतो. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे रस्त्यालगत हे पाणी अडले गेले. त्यामुळे मोठा प्रवाह रस्त्यावरून वसाहतीत घुसला; पण मोठ्या प्रमाणावर कालव्यातील पाणी नाल्यातून पुढे आंबिल ओढ्यात गेले. हा नाला असल्यामुळे पाण्याला दिशा मिळाली. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पाणी नाल्यातून वाहत होते. हा नाला नसता, तर आणखी हानी झाली असती.
अतिक्रमण, उंदीर, घुशींनी फोडला कालवा ?
पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या कालव्याच्या भोवताली बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्यातील काही अतिक्रमणे सुमारे एका वर्षापूर्वी महापालिकेने काढून टाकली. या भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्रे केल्यामुळे कालव्याचा मातीचा पाया खचला. त्यामुळे कालवा फुटण्याची घटना घडली, असा तर्क जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी लावला आहे.
अनधिकृत केबल खोदाईमुळेच कलव्याला भगदाड
पुणे : मुठा उजव्या कालव्याला ज्या ठिकाणी भगदाड पडले तेथे कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्येच अनधिकृतपणे केबल खोदाई करून तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कालव्याच्या शेजारीच महापालिकेने बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम केले. यामुळेदेखील कालव्याची मातीची भिंत ढिसाळ झाल्याने ही दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खडकवासला मुठा उजवा कालव्याला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ भगदाड पडले. त्यानंतर हा कालवा कसा फुटला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या कालव्याला ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले, त्या ठिकाणी कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या आहेत.
महापौरांना करावा लागला नागरिकांच्या संतापाचा सामना
१पुणे : कालवा फुटल्याने सिंहगड रस्त्यावर निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक व स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आले. त्या वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष व हालगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि आमचे संसार रस्त्यावर आल्याची संप्तत भावना व्यक्त करत नागरिकांनी महापौर व महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रशासन मदतीसाठी उशिरा पोहोचल्याने ‘मतं मागायला येता, मदतील कधी येणार’ असा सवालदेखील उपस्थित केला.
२कालव्याला सव्वा आकराला भगदाड पडले आणि काही क्षणातच हजारो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतु हक्केच्या अंतरावर असलेले महापालिका प्रशानस, महापालिकेचे आपत्ती निवारण कक्षाचे लोक यापैकी कोणीदेखील तास-दीड तासात घटनास्थळी आले नाही, असा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे महापौरांना सांगितले. आमचे संसार वाहून गेले़ आता काय पाहिला आल्या, असे सांगत महिल्यांनी महापौरांना घेरावा घातला. यामध्ये काही लोकांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणादेखील दिल्या. महापौर आल्यानंतर बाधित लोकांनी प्रचंड गर्दी केली़ घोषणाबाजी, नागरिकांचा संताप यामुळे महापौरांची प्रचंड गोची झाली. अखेर परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून परिसराची पाहणी न करताच परत गेल्या.
वाहतूककोंडीने उडाला हाहाकार
पुणे : पर्वती येथे मुठा कालवा फुटून त्या पाण्याने सिंहगड रोडवर पूर आल्याने त्याचा परिणाम शहरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक जवळपास ३ तास ठप्प झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी कालवा फुटल्याने पाणी वेगाने वाहून सिंहगड रस्त्यावर आले़ त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली़ दांडेकर पुलाच्या चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चौकातील वाहतूकही बंद पडली़ त्याचा परिणाम होऊन सारसबागेकडून येणारी पूर्णपणे थांबल्याने रांगा सारसबागेपर्यंत गेल्या़