नेमक्या उंदीर, घुशी कोण? वीज विभाग की खाजगी कंपन्या ? निलम गोऱ्हे यांचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:21 PM2018-09-28T17:21:00+5:302018-09-28T17:22:17+5:30
पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे : पर्वतीजवळील मुठा कालव्याला भगदाड पडल्याच्या घटनेची पाहणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केली. यावेळी त्यांनी पाठबंधारे खाते आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उंदीर, घुशींनी पोकरल्याने कालवा फुटल्याच्या वक्तव्याचा खोचक शब्दांत समाचार घेतला.
कालव्याच्या भींतीजवळ बेकायदेशीरपणे वीज विभाग आणि खाजगी कंपन्यांच्या वायर टाकल्या आहेत. आता अधिकाऱ्यांनी यातील उंदीर आणि घुशी कोण आहेत याच शोध लावावा, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने हा प्रकार घडला आहे. काही वृत्तपत्र तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या तरीदेखील यंत्रणांनी काम केले नाही. परंतु लोकांच्या जीवावर बेतेपर्यंत प्रशासन शांत बसणार का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
या पाण्यात एका कुटुंबाचे मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपये वाहून गेले. या घटनेची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. यावर गोऱ्हे यांनी एक लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश या कुटुंबाला दिला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, भारिपच्या अँड. वैशाली चांदणे, उपशहरप्रमुख किरण साळी, नगरसेवक बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, राजेंद्र शिंदे, सुरज लोखंडे, अनिता परदेशी, गीता वर्मा आदी उपस्थित होते.