मटार, पावट्याच्या दरात घट, पालेभाज्यांचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:36 AM2017-12-11T03:36:53+5:302017-12-11T03:37:08+5:30
गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी भाजी-पाल्याची राज्य व परराज्यातूनदेखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट, पावटा, वाल, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी भाजी-पाल्याची राज्य व परराज्यातूनदेखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट, पावटा, वाल, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट झाली. यामध्ये मागणी वाढल्याने आल्याचे दर काही प्रमाणात वाढले असून, अन्य सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी (दि. १०) सुमारे २२५ ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून प्रामुख्याने बेंगलोर येथून दोन टेम्पो आले, मध्य प्रदेशमधून २२ ट्रक मटार, गुजरात, राजस्थानमधून १० ते ११ ट्रक गाजर, आंध्र प्रदेश व तमिळनाडूमधून २ ते ३ ट्रक शेवगा, आंध्र प्रदेश, गुजरात येथून १५ ते १६ टेंपो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून ३ ते ४ ट्रक कोबीची आवक झाली.
तर स्थानिक भागातून सातारी आले १२०० ते १३०० पोती, टॉमेटोची सहा हजारापेक्षा अधिक पेटी, हिरवी मिरचीची ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवरची १८ ते २० टेम्पो, कोबीची २० ते २२ टेम्पो, ढोबळी मिरचीची १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंगांची २५ पोती, पावटा ८ ते १० टेम्पो, वांगी ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळाची ८ ते १० टेम्पो, गवारची ७ ते ८ टेम्पो, भेंडीची ८ ते १० टेम्पो, आवक झाली, नवीन कांद्याची १५० ट्रक, तर जुन्या कांद्याचे २० ते १५ ट्रक आवक झाली.
आग्रा, इंदौर आणि गुजरात भागातून मिळून बटाट्याचे ६० ते ६५ ट्रक इतकी आवक झाली. तळेगाव बटाट्याचीदेखील आवक सुरू झाली असून, रविवारी सुमारे ७०० ते ८०० गोणी बटाटा मार्केटमध्ये दाखल झाला होता. या बटाट्याला स्थानिक ग्राहकांकडून चांगली मागणी असून, दरदेखील १०० ते १४० इतके मिळत आहे.
लग्नतिथीनुसार फुलांची मागणी कमी- जास्त
सध्या लग्नसराईमुळे फुलांची मागणी वाढली असली तरी, तथीनुसार ही मागणी कमी जास्त होत आहे. यामुळे दरामध्ये दहा टक्क्यांनी घट झाली असल्याचे व्यापारी धनंजय भोसले यांनी सांगितले. यामध्ये झेंडूला २० ते ६० रुपये, सुट्टा कागडा २०० ते ४०० रुपये दर मिळाले.
पपई, पेरुची आवक वाढली; चण्यामण्याची आवक घटली
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पपईची आवक वाढली असून, पेरुदेखील मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये दाखल होत आहेत. यामुळे दोन्ही फळाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. रविवारी येथील फळबाजारात मोसंबी ६० टन, संत्री ५०० पेट्या, डाळिंब ६० ते ७० टन, पपई २० ते २५ टेम्पोे, लिंबाची ८ ते ९ हजार गोणीइतकी आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
मेथी, कोथिंबिरीचे दर घटले, अन्य दर स्थिर
रविवारी मार्केट यार्डमध्ये कोथिंबिर व मेथीची प्रत्येकी २ लाख जुड्यांची आवक झाली. यामुळे दर काही प्रमाणात घटले आहेत, तर शेपू, कांदापात, करडई, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई, पालक, हरभरा गड्डीचे दर मागणी आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. कोथिंबिरीला शेकडा २०० ते ३०० रुपये, मेथी २०० ते ४०० रुपये आणि शेपूला ३०० ते ५०० रुपयांचे दर मिळाले.