ट्रॅव्हल कंपनीचा डेटा चोरून 62 लाखांच्या 150 विमान तिकिटाची परस्पर विक्री...
By भाग्यश्री गिलडा | Published: May 26, 2023 05:35 PM2023-05-26T17:35:01+5:302023-05-26T17:35:25+5:30
पुण्यातील कोट्यावधी रुपयांचा ट्रॅव्हल व्यवसाय असलेल्या दोन नामांकित ट्रॅव्हल एजन्सीची आर्थिक फसवणूक
पुणे : खाजगी विमान कंपनीकडे असलेली प्रीपेड खात्यातील माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने 62 लाखांची तब्बल 150 विमानतिकिटांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोट्यावधी रुपयांचा ट्रॅव्हल व्यवसाय असलेल्या दोन नामांकित ट्रॅव्हल एजन्सीची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा आणि रास्ता पेठ परिसरात सदर ट्रॅव्हल कंपनीची कार्यालय आहेत. तीन वेगवेगळ्या खाजगी विमान कंपन्यांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी या ट्रॅव्हल एजन्सीने विमान कंपनीच्या खात्यात प्रीपेड खाते उघडले आहे. संबंधित खात्याचा वापर करून ट्रॅव्हल एजंट प्रवाशांची आगाऊ तिकिटे काढत असते. त्यासाठी ट्रॅव्हल कंपनीकडून काही रक्कम खाजगी विमान कंपन्यांना देऊन आधीच बुकिंग केलेली असते.
एप्रिल महिन्यात संबंधित विमान कंपनीकडे ट्रॅव्हल्स कंपन्यांची खाती यामधील माहिती अज्ञात व्यक्तीने चोरली. या माहितीचा वापर करून संबंधित व्यक्तीने देशांतर्गत विमानसेवेची 148 तिकिटे आणि दोन आंतरराष्ट्रीय प्रवासाची विमान तिकिटे अशी एकूण 150 तिकिटे ऑनलाईन काढून लोकांची फसवणूक केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ट्रॅव्हल कंपनी संबंधित खात्याचा आढावा घेत असताना, याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ट्रॅव्हल कंपनीने अंतर्गत चौकशी केली असता, सदर तिकिटे कंपनीने बुकिंग न करता दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीने बुकिंग केल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ धाव घेत झालेल्या प्रकारची माहिती सायबर पोलिसांना दिली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये वेगवेगळ्या इंटरनेटचा वापर करून तिकिटे बुकिंग करण्यात आल्याचे लक्षात आले आहे.