लोणावळ्यात मविआची वाढलेली मते महायुतीसाठी डोकेदुखी; नगरपालिकेसाठी आघाडीचे मनोधैर्य वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 01:24 PM2024-06-07T13:24:30+5:302024-06-07T13:25:02+5:30
यंदा महाविकास आघाडीची मते वाढल्याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दिसणार आहे....
- विशाल विकारी
लोणावळा (पुणे) :लोकसभा निवडणुकीत मावळ तालुक्यामधून महायुतीच्या श्रीरंग बारणे यांना ४९३५ मतांची आघाडी मिळाली असली तरी लोणावळा शहरात ते ३५३ मतांनी मागे राहिले आहेत. मागीलवेळी लोणावळ्यातून त्यांना सात हजारावर मताधिक्य मिळाले होते. यंदा महाविकास आघाडीची मते वाढल्याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दिसणार आहे.
लोणावळा नगरपालिकेच्या २०१६ मधील निवडणुकीत भाजपच्या सुरेखा जाधव थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर भाजपने शिवसेनेला बाजूला सारत काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. पालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेच्या एक दिवस अगोदरपर्यंत म्हणजे २०२१ पर्यंत ही आघाडी टिकली. मात्र सर्वसाधारण सभेतील काही विषयांवरून शेवटच्या दिवशी भाजप व काँग्रेसमध्ये फूट पडली व आघाडी तुटली होती. त्यानंतर सातत्याने दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न झाला. तो आजही सुरू आहे. शहरात भाजप व काँग्रेस हे दोन मोठे पक्ष असून त्याखालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष व त्यानंतर आरपीआय, मनसे व इतर पक्ष अशी क्रमवारी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पाच वर्षामध्ये राजकीय भूकंप झाले, तरीही लोणावळा शहरात भाजप व काँग्रेसची आघाडी कायम राहिली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, लोकसभा निवडणुकीपर्यंत लोणावळा शहरामधून एकही शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेला नव्हता. निवडणुकीच्या जेमतेम एक महिना अगोदर ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखांनी आणि महिला उपशहरप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश करत शहर प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रवेश झाल्याने शिंदे गटाचे जेमतेम शंभरभर शिवसैनिक तयार झाले होते.
महायुतीतील सर्व पक्षांनी श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला, तर युवक अध्यक्षपद बदलाच्या वादातून अजित पवार गटाला रामराम ठोकत शरद पवार गटात गेलेला राष्ट्रवादीचा एक गट, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरे यांचा प्रचार केला. मतदानाच्या दिवशीही मोठी चुरस पाहायला मिळाली.
शहरात संजोग वाघेरेंना ३५३ मतांची आघाडी
निवडणुकीत लोणावळा शहरातून वाघेरेंना ३५३ मतांची आघाडी मिळाली. बारणेंचे मताधिक्य घटले. लोणावळाकरांनी महाविकास आघाडीला कौल दिल्याने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’चे मनोधैर्य वाढले आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुका महायुती व महाविकास आघाडीच्या सूत्राने लढल्या गेल्यातर लोणावळा शहरात ‘मविआ’ची वाढलेली ताकद भाजप व महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.