पुणेकरांसाठी ‘माझा अर्थसंकल्प’; नागरिकांना मिळणार सूचना, योजना सादर करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:29 PM2018-02-05T16:29:10+5:302018-02-05T16:30:36+5:30
शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना शहरासंदर्भातील त्यांच्या सूचना, कल्पना आणि काही योजना सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांकडे शहराच्या विकासासाठी काही कल्पक, नाविन्यपूर्ण योजना, सूचना असतात. शहराचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अधिकधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांवर किमान भार देऊन उत्पन्नाचे अधिकाधिक मार्ग शोधणाऱ्या मतांचे, योजनांचे स्वागत केले जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पुणे शहराच्या विकासासाठी त्यांची मते, सूचना, कल्पना तसेच काही योजना सूचविण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
नागरिकांकडून मिळालेल्या व्यवहार्य आणि योग्य प्रतिसादाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समावेश केला जाईल. पुणे महानगरपलिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळला भेट देऊन ५ फेब्रुवारीपासून १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या उपक्रमात केवळ आॅनलाईन अर्ज भरून सहभागी होता येईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.