‘माझे कोरोना बिल ८३ हजारांनी झाले कमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:10+5:302021-06-17T04:09:10+5:30

पुणे : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच खासगी रुग्णालयांकडून लावल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांनी रुग्णांच्या आणि नातेवाईकांनी ...

'My Corona bill dropped by 83,000' | ‘माझे कोरोना बिल ८३ हजारांनी झाले कमी’

‘माझे कोरोना बिल ८३ हजारांनी झाले कमी’

Next

पुणे : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच खासगी रुग्णालयांकडून लावल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांनी रुग्णांच्या आणि नातेवाईकांनी नाकीनऊ आणले. अवाजवी बिलांचे ऑडिट करून रुग्णांना बाकीचे पैसे परत मिळावेत, यासाठी साथी संस्थेच्या ‘हेल्पलाईन’ने पुणे महापालिकेच्या सहाय्याने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

कोरोना रुग्णाचे बिल दीड लाखापेक्षा जास्त आल्यास ऑडिट करून घ्यावे, बिल अवास्तव असल्याची खात्री झाल्यास त्यातील काही रक्कम नक्की परत मिळू शकेल, असे आवाहन साथी संस्थेने केले आहे.

बिलाची रक्कम परत मिळालेल्या रुग्णाने याबाबत अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी एका कपड्याच्या दुकानात काम करतो. माझे वडील गोळ्या-बिस्कीट विक्रीची छोटी टपरी चालवतात. त्यांना कोरोना संसर्ग झाला. सरकारी रुग्णालयात एकही खाट मिळेना. माझ्या मित्रांनी त्यांच्या ठेकेदारांकडून पगाराची उचल घेतली आणि डिपॉझिट भरण्यासाठी साठ हजार रुपये उसने दिले. वडलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. माझी आणि वडलांची बाईक विकून ८० हजार रुपये कसेबसे उभे केले. पुढे पुणे महानगरपालिकेची यंत्रणा आणि ‘साथी’ हेल्पलाईनच्या प्रयत्नामुळे बिलातले तब्बल ८३ हजार ६०० रुपये रुग्णालयाने परत केले.”

साथी संस्थेच्या शकुंतला भालेराव म्हणाल्या, “ऑगस्ट २०२० पासून हेल्पलाईनला सुरुवात केली. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाट मिळवून देणे, वैद्यकीय सल्ला देणे अशा स्वरूपाची मदत केली. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात पुन्हा हेल्पलाईन कार्यान्वित केली. सध्या आणखी काही बिलांची ऑडिट प्रक्रिया सुरू आहे. खासगी रुग्णालयातील दरांवर सरकारी नियंत्रण आहे, हे अनेकांना माहीत नसते. बिलाची रक्कम आणि ऑडिटबाबत नागरिकांनी सतर्क व्हायला हवे.”

चौकट

येथे करा संपर्क

मनपा, पुणे - ०२० २५५०२११५, ८७६७८५८३०

मनपा, पिंपरी चिंचवड - ०२० ६७३३११५१

साथी कोविड हेल्पलाईन - ९८११३०२५३०

Web Title: 'My Corona bill dropped by 83,000'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.