माझे बाबा तर माझे ऐकत नाही; तुम्ही ऐकणार ना! ३ वर्षांच्या पोलीस कन्येची आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 10:17 PM2020-03-28T22:17:47+5:302020-03-28T22:19:38+5:30
स्वतःच्या घरीही राहावे लागते पोलिसांना वेगळे
पुणे : माझे बाबा पोलीस आहेत. मी माझ्या बाबांना कोरोनामुळे घराबाहेर जाऊ नका सांगते पण ते ऐकतच नाहीत. मात्र तुम्ही ऐकणार ना ! अशी भावनिक साद घातलेल्या एका चिमुकलीचा हात जोडलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीजा शैलेश चव्हाण असे या पोलीस कन्येचे नाव असून तिचे वडील शैलेश चव्हाण हे सध्या सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असली तरीही नागरिक कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हात जोडून विनंती करीत असल्याचे चित्र व्हायरल झाले आहे. माझे पप्पा पोलीस आहेत. मी माझ्या पप्पांना कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर जाऊ नका सांगते पण ते ऐकत नाहीत, काहीही झालं तरी ड्युटीवर जावंच लागेल पण तुम्ही सगळे माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्या पप्पांसारख्या सगळ्या पोलीस, डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी बाहेर पडू नका ,अशी विनंतीही तिने केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. डॉक्टर, पोलीस इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांरी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता नागरिकांनी त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.
..............
स्वतःच्या घरीही राहावे लागते पोलिसांना वेगळे
कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्र पोलीस महत्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हाही दाखल करीत आहेत. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, तसेच त्यांना कोरोना विषाणूपासून रोखण्यासाठीच सध्या पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. मात्र आम्हा पोलिसांना घरी गेल्यानंतर मात्र वेगळ्या खोलीत जेवण तसेच राहावे लागत आहे. कारण आम्हालाही कुटुंब असल्याने त्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याने आम्ही स्वतःहूनच सध्या घरात वेगळे राहत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने 'लोकमत' प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.