माझी वसुंधरा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:36+5:302021-06-10T04:08:36+5:30
जिल्ह्यात प्रथम, विभागात तृतीय बारामती : राज्य शासनाच्या ‘ माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेचा निकाल पर्यावरणदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री ...
जिल्ह्यात प्रथम, विभागात तृतीय
बारामती : राज्य शासनाच्या ‘ माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेचा निकाल पर्यावरणदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत बारामती नगरपरिषदेने ७६१ गुणांसह राज्यात १२ वा, पुणे विभागात तिसरा तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचीची माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली.
यावेळी सन २०२०-२१ या वर्षात माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नगरपरिषद गटामध्ये एकूण २३५ नगरपरिषदा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये बारामती नगरपरिषदेने हे यश मिळविले आहे. शासनाने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषद सहभागी झालेली होती. त्यानुसार स्वच्छता व पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम राबविण्यात आले. या अभियानात बारामती नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना सहभागी करून हरित शपथ घेणे, स्वच्छता मोहीम राबविणे आदी कार्यक्रम राबविले. प्रदुषणमुक्त पर्यावरणासाठी व अभियानाच्या जनजागृतीकरीता अध्यक्षा एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सायकल क्लब आणि बारामती शहरातील पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून बारामती शहरातून वेळोवेळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याचसोबत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याबाबत जनजागृती व्हावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. त्यासोबतच अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या सहकार्याने अभियानाचा प्रसार करण्याकरीता तसेच जास्तीत जास्त नागरिकांना हरित शपथ घेण्याच्या हेतूने सिटीजन व्हॉइस सर्वे घेण्यात आला.
नगराध्यक्षा तावरे यांनी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी घेतलेल्या विशेष मेहनतीकरीता त्यांचे अभिनंदन केले आहे.