‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:35 PM2024-09-19T13:35:40+5:302024-09-19T13:36:55+5:30
मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला
भाग्यश्री गिलडा
पुणे : एलिन कार्लसन ही स्वीडन देशातील तरुणी काही मानसिक विकाराने त्रस्त हाेती. ती भारतात येऊन दिल्लीतील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत हाेती. या विकारावर मात करण्यासाठी तिला यंदाच्या पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला. त्यानुसार ती सहभागीदेखील झाली आणि तिला या विकारातून काहीसा दिलासा मिळाल्याचा अनुभव ‘ती’ने घेतला.
एलिन गेल्या काही वर्षांपासून ‘अगाेरा फाेबिया’ या मानसिक विकाराने त्रस्त होती. भारतातील दिल्लीमध्ये असलेल्या एका मानसोपचार तज्ज्ञांनी तिला पुण्याचा गणेशोत्सव अटेंड करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचा भाग म्हणून एलिनने पुण्यात येऊन गणेशोत्सवाच्या रंगतदार मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होताना एलिनने ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद लुटला. ती म्हणाली, ‘इथे आल्यावर मला मी नॉर्मल असल्याची जाणीव होतेय. या उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर झाल्याचं माझ्या निदर्शनात आलं. वर्षानुवर्षे माझ्या डोक्यात असलेली एक गाठ कुणीतरी उघडलीय, असं मला वाटतंय. मी आस्तिक किंवा धार्मिक नाही; पण माझा अध्यात्मात विश्वास आहे.’