"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:15 PM2024-03-12T14:15:25+5:302024-03-12T14:17:43+5:30
मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले...
पुणे : 'वारंवार माझ्या एकनिष्ठतेवर संशय घेतला जात होता. मी पक्षात आहे हे सांगून सुद्धा माझ्यावर कारवाया झाल्या. पुणे लोकसभा लढवण्यास मी इच्छूक आहे, हे सांगत होतो. अशावेळी वरिष्ठांपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात मनसे नकारात्मक आहे, असा अहवाल दिला जात होता त्यामुळे वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप पोहचत होता, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली. मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. आज (मंगळवार) मोरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, मला वारंवार त्रास दिला जात होता. माझ्यासोबत असलेल्या लोकांना डावलले जात होते. मी वारंवार तक्रारी साहेबांपर्यंत पोहचवल्या, परंतु त्यानंतरही काहीच बदल झाला नाही. माझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असेल तर त्या पक्षात न राहिलेलेच बरे असंही मोरे म्हणाले.
'मी कधीही राज ठाकरे आणि मनसेवर नाराज नाही. परंतु पुण्यात ज्याप्रकारे संघटनेत राजकारण सुरू आहे. ते संघटनेसाठी चांगली नाही. मी जी भूमिका घेतली ती पूर्णपणे विचार करून घेतली आहे. पुढील २-३ दिवसांत मी पुढची भूमिका स्पष्ट करेन. माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला', असल्याचीही तिखट प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
सध्या वसंत मोरे यांच्या कात्रज परिसरातील ऑफिसजवळ कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. काही वेळातच ते माध्यमांशी सविस्तर बोलणार आहेत.