रिक्षाचालकांची प्रतिमा उंचावण्यासाठी ‘माझी रिक्षा, सुरक्षित रिक्षा’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:16+5:302021-09-25T04:10:16+5:30
पुणे : गंभीर गुन्ह्यात रिक्षाचालक सामील झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे रिक्षाचालकांविषयी समाजात चुकीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
पुणे : गंभीर गुन्ह्यात रिक्षाचालक सामील झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे रिक्षाचालकांविषयी समाजात चुकीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यात प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कर पोलिसांकडून ‘माझी रिक्षा, सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. रिक्षाचालकांची प्रतिमा उंचाविणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. स्पर्धेत विजयी ठरलेल्या रिक्षाचालकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लष्कर पोलिसांकडून नवरात्र उत्सवात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आदी याप्रसंगी उपस्थित होते.
स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या रिक्षाचालकास ११ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास पाच हजार रोख, तृतीय क्रमांकास तीन हजार रोख बक्षीस देण्यात येणार आहे तसेच प्रत्येकी एक हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना रिक्षाचालकांनी लष्कर पोलीस ठाण्यात दि. ५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
------------