माझा संसार उघड्यावर पडला, तुम्ही विचार करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 01:07 AM2018-08-05T01:07:29+5:302018-08-05T01:07:49+5:30
‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे.
नीरा : ‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र, दुष्काळी पट्टा, पिकाचा भरवसा नाही; त्यामुळे शेती तोट्यात जायची. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी माझ्या पतीने आत्महत्या केली; पण आज माझा संसार उघड्यावर पडला. माझी पोरंबाळं आता बाप पाहू शकणार नाहीत. घराचा कर्ता गेला तोही माझ्या येणाºया बाळाचं तोंड न पाहता! बाबांनो, माझा संसार उघड्यावर पडला, आता तुमी तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका!’ अशा शब्दांत डोळ्यांत पाणी आणून दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी अश्विनी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
आरक्षणासाठी आत्महत्या केलेले दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी अश्विनी यांच्याशी आज ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांनी समाजातील इतर तरुणांना भावपूर्ण आवाहन केले. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलन चिघळले. याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटले.
जिल्ह्यातील काही तालुक्यांत आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र, पुरंदर तालुक्यात रास्ता रोको, मोर्चा, श्रद्धांजली सभा घेऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले. याच तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे येथील परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आत्महत्या हा मागण्या मान्य करण्याचा अंतिम पर्याय नसून तरुणांनी आत्महत्येकडे वळू नये,
अशी विनवणीच अश्विनी शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाल्या, ‘‘असले कसले सरकार आहे? ज्याला माणसाची किंमत नाही. माझ्या नवºयाचा जीव घेऊन मला पोरके केले. किमान यापुढे तरी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये, हे तरुणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.’’
>कुटुंबाला मदतीची गरज...
घरातील कर्तापुरुष अचानक गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय यांचे बंधू अद्याप लहान आहेत; मात्र घरातील किमान एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच आर्थिक तरतूद मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही कुटुंबाला शक्य तितकी मदत करावी. तसेच, शिंदे यांना गावात घर नसल्याने ते त्यांच्या काकांच्या घरात राहत आहेत. त्यांच्या परिवाराला किमान राहण्यासाठी पक्के घर बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.