पोल्ट्री व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ, शवविच्छेदनात कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:04 AM2018-03-11T06:04:27+5:302018-03-11T06:04:27+5:30
दोन दिवसांपूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्ट्री व्यावसायिक डॉक्टराचा मृतदेह मोटारीत सापडला असून, त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले आहे़
पुणे - दोन दिवसांपूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्ट्री व्यावसायिक डॉक्टराचा मृतदेह मोटारीत सापडला असून, त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले आहे़ डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, तो रासायनिक पृथ:करणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे़
डॉ़ किशोर देविदास शेंडगे (वय ४७, रा़ गणेश नभांगण सोसायटी, रायकरनगर, धायरी) असे त्यांचे नाव आहे़ ते ८ मार्चला दुपारी आपल्या मोटारीतून मित्राबरोबर निघून गेले होते़ शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या चौपाटीवर त्यांच्याच गाडीत आढळून आला़ पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला़ त्यात मृतदेह डिकंपोज झाल्याने नेमके कारण सांगता येत नसल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले आहे़
याबाबतची माहिती अशी, डॉ़ किशोर शेंडगे हे व्हेटनरी डॉक्टर असून त्यांचा कोंबडीची छोटी पिल्ले विकण्याचा व्यवसाय आहे़ साई सुरभी या कंपनीमार्फत ते हैदराबादहून कोंबड्यांची पिल्ले आणून ती येथील शेतकºयांना विकत असत़ ते मूळचे यवतमाळचे असून, गेल्या ९ वर्षांपासून धायरीत राहत आहे़ त्यांचा पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़ त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते़ त्यावरून त्यांचे पत्नीशी वादही होत असत़ ८ मार्चला दुपारी बारा वाजता ते घरातून बाहेर पडले़ त्यानंतर दीड वाजता परत सोसायटीत येऊन मित्रासह मोटार घेऊन ते निघून गेले़ घरी न परतल्याने त्यांची पत्नी श्रद्धा शेंडगे यांनी रात्री ११ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन करुन संपर्क साधला़ तेव्हा त्यांनी आपण मित्र सागर ठाकर यांच्याबरोबर पानशेत येथील धनगर वस्तीत असल्याचे सांगितले़ त्यानंतरही ते घरी आले नाहीत व त्यांचा मोबाईलही बंद लागत होता़ शेवटी दुसºया दिवशी ९ मार्चला त्यांच्या पत्नीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली़ त्यानंतर शनिवारी रात्री हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वायकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि इतर कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना खडकवासला धरणाजवळच्या चौपाटीपासून थोड्या अंतरावर पुढे एक पांढºया रंगाची मोटार उभी असलेली आढळून आली. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस मोटारीजवळ गेले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मोटार लॉक केलेली नव्हती़ मागच्या सीटवर एक व्यक्ती होती़ पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ मोटारीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी डॉ़ किशोर शेंडगे यांची माहिती मिळाली़
एक दिवसात मृतदेह डिकंपोज कसा झाला ?
हवेली पोलीस त्यांच्या मित्रांचा शोध घेत असून, शवविच्छेदनात मृतदेह डिकंपोज झाल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगता येत नाही, असे ससूनच्या डॉक्टरांनी म्हटले असून, व्हिसेरा रासायनिक पृथ:करणासाठी पाठविण्यात आला आहे़ डॉ़ शेंडगे हे ८ मार्चला रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित होते़ त्यानंतर एकाच दिवसात त्यांचा मृतदेह इतका लवकर डिकंपोज कसा झाला? त्यांना दारूचे व्यसन होते, मग, त्यांचा मृत्यू नेमका कसा व कधी झाला? याची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत़ हवेली पोलीस अधिक तपास करीत आहेत़