उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणाचे गूढ उलगडणार, धागेदोरे मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:34 AM2020-11-07T02:34:48+5:302020-11-07T06:36:27+5:30
Gautam Pashankar : पाषाणकर बेपत्ता होण्यामागचे काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. या संदर्भात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
पुणे : उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यापासून त्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, या संदर्भात पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून आठवड्याभरातच या घटनेतील गूढ उलगडले जाईल, असा विश्वास पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला.
पाषाणकर बेपत्ता होण्यामागचे काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. या संदर्भात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुप्ता यांनी प्रथमच ‘लोकमत’ कार्यालयाला शुक्रवारी (दि. ६) भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना राज्यात घडताहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला गाडीच्या बोनेटवरुन फिरविल्याचा प्रकार घडला. या संदर्भात गुप्ता म्हणाले की, असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. सर्वसामान्य नागरिकांध्ये पोलिसांविषयी आदर असला पाहिजे आणि गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे.