भीमा नदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उघडले; चुलत भावांनी घडविले सामूहिक हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:51 PM2023-01-25T17:51:41+5:302023-01-25T17:52:25+5:30
बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले...
- संदीप चाफेकर
यवत (पुणे) : यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सातही जणांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
याबाबतची पत्रकार परिषद पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यवत पोलिस ठाण्यात घेतली. सामूहिक हत्याकांडाचा तपास पोलिसांनी केला असून, पाच आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी खून करणाऱ्या आरोपी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (३५), शंकर कल्याण पवार (३७) प्रकाश कल्याण पवार (२४) व कांताबाई सर्जेराव जाधव (४५, रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) यांना अटक केली आहे. आरोपी मयतचे चुलत भाऊ आहेत. पोलिस तपासात आरोपी अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यामध्ये मयत मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत, असा संशय आरोपींना होता. तोच राग त्यांच्या मनात होता. त्या कारणावरून बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
पारगाव येथील भीमा नदीच्या पुलालगत बुधवार (दि. १८) ते रविवार (दि. २२) च्या दरम्यान पोलिसांना सात मृतदेह मिळून आले होते. एकाच वेळी तब्बल सात मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. अनोळखी मयत इसमांच्या नातेवाइकांचा शोध यवत पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण करीत होते. त्यापैकी शुक्रवारी (दि. २०) रोजी नदीपात्रात मिळालेल्या मयत महिलेजवळ एक मोबाइल सापडला त्यावरून मयतांचे नातेवाइकांचा शोध पोलिसांनी लावला.
मयतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला व तीन लहान मुलांचा समावेश होता. मयत मोहन पवार हे पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई श्याम, नातू रितेश, छोटू, कृष्णा यांच्यासह मुलगा अनिल याच्याबरोबर मागील एक वर्षापासून निघोज, ता. पारनेर येथे राहून मजुरी काम करत होते.
एकाच वेळी सात मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मिळून आल्याने सुरुवातीला सामूहिक आत्महत्या आहे की काय, अशी चर्चा सुरू होती. मयत इसमांच्या अंगावर कसल्याही मारहाणीच्या जखमा नसल्याने अशी चर्चा केली जात होती. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य दिशेने तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान काही पुरावे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावरून सर्वांची हत्या केली असल्याचा शोध पोलिसांनी लावला.
नाहीतर प्रकरण दडपले असते...
अपघाती मृत्यू नसून खून असल्याच्या संशयावरून चुलत भावांनीच संपूर्ण कुटुंबाचा खून केला. सदर सामूहिक हत्याकांड करणारा आरोपी सुशिक्षित नाहीत. मात्र त्यांनी केलेला गुन्हा समोर येण्यास आठवडा गेला. पोलिसांनी आकस्मित मयतांचा तपास करताना खोलवर तपास केला नसता तर कदाचित हा प्रकार उघडकीस आला नसता. मात्र पोलिसांनी घटनेतील बारकावे लक्षात घेत योग्य तपास केल्याने सदर हत्याकांड उघडकीस आले.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शेळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननावरे, संजय नागरगोजे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, पोलिस हवालदार सचिन गाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगले, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, नीलेश शिंदे, धीरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडू वीरकर, अक्षय सुपे, नीलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला.