एन. डी. पाटील यांची इनोव्हा सापडली

By admin | Published: February 22, 2017 12:17 AM2017-02-22T00:17:11+5:302017-02-22T00:17:11+5:30

पुण्यातील गॅरेज मालकास अटक; मुख्य सूत्रधारासह दोघे पसार

N. D. Patil found his INOVA | एन. डी. पाटील यांची इनोव्हा सापडली

एन. डी. पाटील यांची इनोव्हा सापडली

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची चोरीस गेलेली बारा लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी पुण्यामध्ये मिळाली. या प्रकरणी आंतरराज्य टोळीतील पुण्यातील गॅरेज मालक जुबेर रज्जाक सय्यद (वय ३७, रा. तळवडे, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून इनोव्हासह गुन्'ात वापरलेली आलिशान कार असा सुमारे वीस लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मुख्य सूत्रधार मनजितसिंग जोगिंदरसिंग मारवा (रा. दिल्ली, सध्या रा. पुणे) याच्यासह दोघे साथीदार पसार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीने राज्यात विविध जिल्'ांत अनेक चारचाकी वाहनांची चोरी करून त्यांची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सोमवारी (दि. १३) मध्यरात्री रुईकर कॉलनी येथून प्रा. एन. डी. पाटील यांची बंगल्यासमोर लावलेली इनोव्हा गाडी चोरट्यांनी चोरून नेली.


पोलिसांना ही गाडी शोधून काढणे आव्हानात्मक होते. सीसीटीव्ही फुटेजवरून ही गाडी पुण्यापर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. तेथून पुढच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडी दिसत नव्हती. फुटेजमध्ये चौघा चोरट्यांपैकी मनजितसिंग या पोलिस रेकॉर्डवरील चोरट्याची ओळख पटली होती. त्याचे मोबाईल लोकेशन पुणे-गुजरात दाखवत असल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करत होते.
इनोव्हा पुण्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने पोलिसांनी उलटमार्गी पुणे ते कोल्हापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आणेवाडी टोलनाका येथून पांढऱ्या रंगाची आलिशान कार कोल्हापूरकडे येताना दिसली. तीच गाडी पुढे किणी टोलनाक्यावर सव्वा सातच्या सुमारास पास झाली. त्यानंतर मध्यरात्री दोनपर्यंत या चोरट्यांनी एखाद्या हॉटेलचा आसरा घेत जेवण केले; तेथून ही गाडी मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रा. पाटील यांच्या घरासमोर दिसली. त्यामुळे चोरटे हे पुण्याचे असल्याची खात्री झाली. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी येथील खबऱ्याकडून माहिती घेतली असता तळवडे येथील जुबेर सय्यद याचे चारचाकी दुरुस्ती व विक्रीचे गॅरेज आहे. तिथे जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार कोणत्या कंपनीची, मॉडेलची गाडी हवी आहे, ते पाहून महागडी गाडी कमी किमतीत तो आणून देत असे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार तीन पोलिस पथकांना तळवडे येथे पाठविले. याठिकाणी सात दिवस तळ ठोकून दिवस-रात्र जुबेर याच्या दिनक्रमाची माहिती घेतली. तो चोरीची वाहने विक्री करत असून त्यानेच प्रा. पाटील यांच्या इनोव्हाची चोरी केल्याची खात्री होताच त्याला ताब्यात घेतले. ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच त्याने प्रा. पाटील यांची इनोव्हा गाडी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या गॅरेजमध्ये विविध कंपन्यांच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट विक्रीसाठी ठेवले होते. त्यामध्ये इंजिन व इतर महत्त्वाचे स्पेअर पार्टही होते. हा सर्व मुद्देमाल चोरीच्या गाड्यांचा असल्याची त्याने कबुली दिली. जुबेर हा मूळचा जालना येथील. सन १९९८ मध्ये तो कामानिमित्त पुण्यात आला. त्यानंतर जुन्या गाड्या-खरेदी विक्रीच्या व्यवसायातून त्याची मनजितसिंग याच्याशी ओळख झाली. चोरीच्या गाडी विक्रीतून पैसे मिळाल्यानंतर त्याने गॅरेज सुरू केले. या गॅरेजच्या नावाखाली तो चोरलेल्या गाड्या ग्राहकांना विकत असे.
स्क्रॅप गाडीचा नंबर व कागदपत्रांचा वापर
संशयित जुबेर हा विविध कंपन्या व मॉडेलच्या स्क्रॅप झालेल्या गाड्या आणत असे. महागड्या गाड्या तो कमी किमतीत देत असल्याने जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा त्याच्याकडे ओढा असायचा. त्यांच्या मागणीनुसार तो मनजितसिंग याच्याशी संपर्क साधून स्क्रॅप झालेल्या गाडीची नंबरप्लेट व कागदपत्रे त्याच्याकडे देत असे. त्यानंतर तो व त्याचे सहकारी ग्राहकाच्या मागणीनुसार गाडीचा शोध घेऊन ती चोरून जुबेरला देत असत. त्या गाडीची रंगरंगोटी करून स्क्रॅप केलेल्या गाडीचा नंबर लावून तिची तो विक्री करत असे. गाडी चोरण्यामध्ये मनजितसिंग व त्याचे साथीदार चाणाक्ष आहेत. गाडीचे लॉक निघाले नाही की काच फोडून आतमध्ये जात असत. एका पट्टीने ते गाडीचा मुख्य स्विच सुरू करून गाडी घेऊन जात असत.
इनोव्हाच्या विक्रीची तयारी
पोलिस संशयित जुबेर सय्यद याच्यापर्यंत उशिरा पोहोचले असते तर प्रा. पाटील यांच्या इनोव्हाची विक्री झाली असती. त्याने प्रा. पाटील यांची गाडी चोरल्यानंतर नंबरप्लेट बदलून विक्रीसाठी ती गोडावूनमध्ये लावली होती. चार-सहा ग्राहक इनोव्हा पाहूनही गेले होते.
पोलिसांची खेळी ओळखली
चारचाकी वाहनचोरीच्या टोळीमध्ये मनजितसिंग हा म्होरक्या आहे. सात-आठ महिन्यांपासून तो पुण्यामध्ये कुटुंबासह भाड्याच्या घरी राहतो. त्याच्या घरी अपंग पत्नी व दोन मुले असतात. पोलिसांनी त्याच्या पत्नीमार्फत ‘मनजितसिंगला हजर व्हायला सांग, त्याला या गुन्'ात मदत करतो,’ असा निरोप पोहोचविला; परंतु चाणाक्ष मनजितसिंगने पोलिसांची खेळी ओळखून मोबाईल बंद करून तो गुजरातकडे पसार झाला.
असा मिळणार गाडीचा ताबा
संशयित जुबेर सय्यद याच्याकडून इनोव्हा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी सय्यदला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका झाली. सध्या इनोव्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी प्रा. पाटील यांना वकिलातर्फे फिर्यादीच्या नावे गाडीचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. अर्ज दाखल करताच त्यांना तत्काळ गाडीचा ताबा मिळणार आहे.
---------------------------------------
फोटो : २१०२२०१७-कोल-जुबेर सय्यद (आरोपी)
---------------------------------------
फोटो : २१०२२०१७-कोल-इनोव्हा
कोल्हापूर पोलिसांनी प्रा. एन. डी. पाटील यांची चोरी झालेल्या इनोव्हा गाडीसह आलिशान कार चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केली. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापूर पोलिसांनी प्रा. एन. डी. पाटील यांची चोरी झालेल्या इनोव्हा गाडीसह आलिशान कार चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केली.

Web Title: N. D. Patil found his INOVA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.