एन. के. साम्राज्य टोळीचा मोरक्याला दिल्लीमधून केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:03+5:302021-05-12T04:10:03+5:30
शिरूर येथे नगरसेवक महेद्र मल्लाव यांचा भरदिवसा बाजारपेठेत एन. के. टोळीकडून खून करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात या ...
शिरूर येथे नगरसेवक महेद्र मल्लाव यांचा भरदिवसा बाजारपेठेत एन. के. टोळीकडून खून करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात या टोळीची दहशत वाढत चालली होती. या टोळीचा मोहरक्या नानू ऊर्फ नीलेश चंद्रकांत कुर्लप व त्यांचे सदस्य यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा सदस्यांना मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १३ जनांना गजाआड केले होते. मात्र, मोहरक्या नानू ऊर्फ नीलेश कुर्लप हा फरारी होता. त्याला दिल्ली येथून अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
जानेवारीमध्ये प्रवीण गोकुळ गव्हाणे यास एन. के. साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतीश पवार, अभिजित ऊर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम ऊर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, नीलेश ऊर्फ नानू चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश ऊर्फ बाबू चंद्रकांत कुर्लप यांनी कट करून शिरूर शहरात भररस्त्यात सायंकाळच्या वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या नीलेश ऊर्फ नानू चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून गुन्हयाचे तपासादरम्यान फरारी होता. या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करणेसाठी पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि सचिन काळे, पो.ना.राजू मोमीन, पो. ना. अजित भुजबळ, पो.ना.गुरू जाधव, पो.ना.मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचे समांतर तपासात असताना नीलेश ऊर्फ नानू चंद्रकांत कुर्लप हा दिल्ली येथे पळून जाऊन लपून बसला आहे, अशी गोपनीय माहिती बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या नीलेश ऊर्फ नानू कुर्लप यास दिल्ली येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केलेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.
आरोपी नानू कुर्लप याला दिल्ली येथे जेरबंद केल्यानंतर त्याच्यासमवेत पोलीस अधिकारी पद्माकर घनवट व तपास पथक.