पुन्हा एकदा 'भाजपाच नंबर वन' असल्याचे सिद्ध झाले- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:54 PM2022-01-19T19:54:25+5:302022-01-19T19:57:09+5:30
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत
पुणे: राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने (BJP) सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी बुधवारी सांगितले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल. त्यांनी सांगितले, गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली.