नागनाथ कोत्तापल्ले यांची एक लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:08 AM2018-11-02T04:08:41+5:302018-11-02T04:09:40+5:30
इन्शुरन्स पॉलिसी नसतानाही जादा पैशांचे आमिष दाखवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची दोघांनी एक लाखांची फसवणूक केली आहे.
पुणे : इन्शुरन्स पॉलिसी नसतानाही जादा पैशांचे आमिष दाखवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची दोघांनी एक लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी रेणुका आचार्य व प्रशांत दीक्षित (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत घडली. आचार्य आणि दीक्षित यांनी कोत्तापल्ले यांच्याशी फोनवर तसेच ई-मेल आयडीवर वारंवार संपर्क साधून एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी नसताना पॉलिसीचे जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवून आरोपींनी स्वत:च्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात कोत्तापल्ले यांना एक लाख रुपये भरण्यास सांगितले. कोत्तापल्ले यांनी पैसे भरल्यानंतर मात्र दोघांनी कसलाही मोबदला दिला नाही.