...मात्र प्रेम गुपचुप करावे लागते : नागराज मंजुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:07 PM2019-04-08T14:07:13+5:302019-04-08T14:09:50+5:30
आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या.
पुणे : गाैतम बुद्धांसारख्या कितीतरी हुशार माणसांनी माणसाच्या आंतरिक उर्मीला जपले पाहिजे, हे सांगून ठेवले आहे. स्वातंत्र्य, प्रेम या मुल्यांची ओळखही याच हुशार माणसांनी करुन दिली आहे. आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या.
मुर्टी- माेढवे येथील यशवंतराव माेरे पाटील आश्रमशाळा येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंजुळे बाेलत हाेते. अक्षर मानव चे संस्थापक ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी या कार्यक्रमामागील भूमिका समजावून सांगितली. मंजुळे म्हणाले, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. स्वातंत्र्यानंतर काेणते मूल्य महत्त्वाचे असेल, तर ते प्रेम हेच आहे. आजकाल मला गर्दीची दहशत वाटते. गर्दीत जायला नकाे वाटतं. गर्दीतून एखादा चेहरा येताे, ताे माझ्याबराेबर सेल्फी काढताे आणि सेल्फी काढल्या काढल्या निघूनही जाताे. एखाद्याचं पाकीट मारलं गेल्यावर त्याला जसं वाटेल तसंच काहीसं मला या सेल्फी घेणाऱ्यांबाबत वाटतं. एका शब्दाचाही संवाद करायला ते उत्सुक नसतात. त्यामुळे मी जाहीर भाषणे बंद केली आहेत. पण इथं मला मजा येतेय. खूप दिवसांनी मी अशा पद्धतीचा संवाद साधायला आलाे आहे.
तुम्ही हाॅरर फिल्म भविष्यात बनवणार का या प्रश्नावर नागराज म्हणाले, तुमच्या शेजारी बसलेला माणूस तुमच्या जातीचा नाही, ही भावना मनात येणे, हेच मला खूप हाॅरर वाटते. खरेतर आपल्या इथे एकट्या माणसांनी खूप माेठी कामे करुन दाखवली आहेत. शिवबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, र. धाे. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम करुन ठेवलं ते एकत्र समूहाला करता आले नाही. त्यांनी जे सांगितलं ते अंमलात आणला आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच शिवाजीमहाराज यांच्यासारखा माणूस हा जवळ काहीही नसताना स्वराज्याच्या प्रेरणेने उभा राहताे. त्यांची आई जिजाऊ त्याला प्रेरित करते. आणि मावळ्यांच्या मदतीने वेगवेगळी युद्ध काैशल्यं शाेधून काढत हा माणूस स्वराज्याची निर्मिती करताे. शिवाजीमहाराजांचा हा प्रवास मला खूप भारी वाटताे. त्यामुळेच शिवाजीमहाराजांवर चित्रपट करण्याची मला इच्छा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.