विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही : नागराज मंजुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:47 PM2022-04-22T12:47:02+5:302022-04-22T12:50:04+5:30
नागराज म्हणाले, नीट वागणे, संवेदनशील वागणे यालाही विद्रोहच समजले जाते...
पुणे : जगणे हे चांगल्या रीतीने बदलत पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विध्वंस नाही. जायला हवे, जुने, जळमटलेले आणि खराब आहे ते तुम्ही मागे सोडले पाहिजे. त्यासाठी जो माणूस विचार करतोय त्याला विद्रोही म्हणावे लागेल. तसेच चांगल्या व सकारात्मक गोष्टींकरिता होणारा विद्रोह चूक नसून, तो खूप गरजेचा आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये नागराज मंजुळे यांनी विविध विषयांवर विचार मांडले. यावेळी मंजुळे म्हणाले, आजकाल प्रेम करणे हाही एक विद्रोहच आहे. नीट वागणे, संवेदनशील वागणे यालाही विद्रोहच समजले जाते. विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही.
महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी लघुपट केला आणि या चित्रपट क्षेत्रात प्रवास सुरू झाला आणि तो आयतागायत सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील दहा वर्षे कशी निघून गेले म्हणाले. कळलेच नाही. मी चित्रपटांच्या व्यावसायिक यशाकडे जास्त बघत नाही. जी गोष्ट आहे. त्याचा जो सेन्स आहे ती त्याच पद्धतीने समाजापुढे मांडली पाहिजे. पैसे कमावावे म्हणून मी 'झुंड' बनवला नाही. 'सैराट' चालला म्हणून मी भारी दिग्दर्शक आहे, असेही नाही. काम करत राहिले पाहिजे, चालत राहणे गरजेचे असल्याचे मंजुळे म्हणाले.
सेन्सॉरशिपबद्दल बोलताना मंजुळेंनी सांगितले, ओटोटी हे स्वतंत्र असून, येथे सेन्सॉरशिप नाही. आपल्याकडे सेन्सॉरशिपचे मुद्दे वेगवेगळे आहेत. सेन्सॉरशिप असायला हवीच, पण ते विचार करून करायला हवे. कशाला आणि कोणत्या गोष्टीला सेन्सॉरशिप असावी हे कळले पाहिजे. मात्र, सेन्सॉरशिप असावी, पण जाचक नको.
पुढे बोलताना नागराज म्हणाले, संवेदनशील चित्रपट झाले पाहिजेत. तो जगण्याचा कोपरा त्यात आलाच पाहिजे. त्यातून मनोरंजनही झाले पाहिजे. मराठीत अनेक संवेदनशील चित्रपट बनत आहेत. आपल्याकडे खूप साध्या, जगण्याला धरून चित्रपट तयार होतात. आपले शक्तिस्थळ आहे की आपण असे चित्रपट करतो. मराठीचा तो गुण आहे, तो मलाही लागला आहे.