corona virus ; पुण्यातील नायडू रुग्णालयाची क्षमता पूर्ण ; आता सिम्बॉयोसिस रुग्णालयाचा होणार वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 07:17 PM2020-04-07T19:17:31+5:302020-04-07T19:19:17+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत .
पुणे :'कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. याच हॉस्पिटलची पाहणी महापौर मोहोळ यांनी करुन तयारीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सिम्बॉयोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार,डॉ विद्या येरवडेकर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन उपस्थित होते. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय पूर्ण भरल्याने आता पुढची तयारी वेगाने केली जात आहे.
या संदर्भात बोलताना मोहोळ म्हणाले की, 'शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना भविष्यातील धोके आणि इतर देशात आलेले अनुभव लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून केला जाणार आहे. शिवाय जे रुग्ण या योजनेला पात्र होणार नाहीत, त्यांचा खर्च महापालिका सीजीएचएस दराप्रमाणे अदा करणार आहे. हा करार सहा महिन्यांसाठी असून डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सिम्बॉयोसिसचे असणार तर पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क महापालिका उपलब्ध करुन देणार आहे'.