पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 07:40 PM2020-04-20T19:40:18+5:302020-04-20T19:41:43+5:30
संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यही क्वारंटाईन
पुणे : ससूनसह अन्य काही खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिकाही कोरोनाबाधित झाली आहे. रुग्णालयातील अन्य डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनासर्दश लक्षणे नसल्याने त्यांची चाचणी केली जाणार नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांसह एका डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. तर खासगी रुग्णालयातील परिचारिकेलाही काही दिवसांपुर्वी लागण झाली आहे. पण सुमारे दीड महिने नायडू रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे कोणालाही संसर्ग झालेला नव्हता. पण अखेर रविवारी एका परिचारिकेला लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले. ही परिचारिका सुरूवातीपासून या रुग्णालयात कार्यरत आहे. तिला कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणु संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये तिला बाधा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
दरम्यान, परिचारिकेला संसर्ग झालेला असला तरी अन्य कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांची तपासणी केली जाणार नाही. लक्षणे आढळून आल्यानंतरच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. आतापर्यंतही कोरोना रुग्ण दाखल झाल्यापासून कोणाचीच तपासणी करण्यात आली नव्हती, असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.