नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार; रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:26 AM2023-01-11T10:26:50+5:302023-01-11T10:27:00+5:30
ऑक्सिजन प्रकल्पासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे
पुणे : काेराेनासह साथीच्या आजारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नायडू रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. त्यासाठी जागा व्हावी म्हणून नवीन इमारत आणि जुने वॉर्ड या जागेतील ऑक्सिजन प्रकल्प इतरत्र स्थलांतरित केला जाणार आहे. इतर देशांत कोरोना वाढत असताना हा ऑक्सिजन प्रकल्प इतरत्र हलवला जाणार असल्याने रुग्णांची गैरसाेय हाेऊ शकते.
मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासल्याने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये नायडू रुग्णालयात दोन ऑक्सिजन निर्मिती टँक, एक रिफिलिंग स्टेशन आणि एक लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला. दोन्हीसाठी जवळपास सव्वातीन कोटी रुपये खर्च केला आहे. दोन्ही टँकची क्षमता दोन हजार लिटर प्रति मिनिट एवढी आहे.
महाविद्यालयासाठी प्रयोगशाळा व इतर सुविधा नायडू रुग्णालयात उभारण्यात येत असल्याने हे रुग्ण इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या दोन ब्रिटिशकालीन वॉर्डमध्ये हलविले आहेत. तिथे रुग्णांना सिलिंडर मार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हा टॅंक जवळपासच स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आराेग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.