नायगावला बेसुमार वाळूचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:52 AM2018-12-13T01:52:24+5:302018-12-13T01:52:41+5:30
वन व महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; झाडांची कत्तल, तस्करीसाठी रस्ते
राजेगाव : नायगाव (ता. दौंड) येथील वन विभागाच्या हद्दीतून खुलेआम वनातील झाडे, मुरूम काढून वाळूचोरीसाठी रस्ते केले जात आहेत आणि वनहद्दीतून वाळूचोरी केली जात आहे; मात्र याकडे हे वनअधिकारी व महसूल अधिकारी साफ डोळेझाक करीत आहे.
वन विभागाचे अधिकारी मात्र रस्त्यापुरतीच आमची जागा असून, इतर जागाही खासगी असल्याचे सांगून अंग झटकून मोकळे होत आहेत.
नायगाव (ता. दौंड) येथे वन विभागाची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. येथील वनअधिकारी व कर्मचारी हे येथील नागरिकांना या वनक्षेत्रात पाऊलही टाकू देत नाहीत. त्यांच्यावर लगेच कार्यवाहीचा बडगा उगारतात. त्यामुळे या क्षेत्रात नागरिक आपला वावर करीत नाहीत; मात्र आज या भागातून खुलेआम येथील वनातील झाडे, मुरूम काढून वाळूचोरीसाठी रस्ते केले जात आहेत आणि वनहद्दीतून वाळूचोरी केली जात आहे; मात्र याकडे हे वनअधिकारी व महसूल अधिकारी डोळेझाक करीत आहे.
भीमा नदीपात्रात अनेक महिन्यांपासून बेसुमार चोरून वाळूउपसा चालू आहे. सध्या या ठिकाणी भीमा नदीपात्रात यांत्रिक बोटींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. महसूल व वन विभाग यांच्याकडून कारवाई होतच नसल्याने हे वाळूतस्करांना माहीत असल्याने फायबरच्या अवाढव्य बोटी भीमा नदीपात्रातून उपसलेल्या वाळूची वाहतूक करीत आहेत.
रस्त्यासाठी येथील माफियांनी वनक्षेत्रातील मोठी झाडे भस्मसात करून त्यावर रस्ते तयार केले आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या मजबुती करणासाठी वनक्षेत्रातील मुरूमच वापरत आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे; मात्र याकडे महसूल व वनविभाग डोळेझाक करत आहे. इतके होऊनही काहीच कारवाई होत नसल्याचा फायदा घेत या माफियांमध्ये वाळूउपशाची स्पर्धाच लागली आहे.
वन विभागाचे अधिकारी एम. एन. हजारे म्हणाले की, वाळू वाहतूक ही वन विभागाच्या क्षेत्रातून होत नसून खासगी जागेतून होत आहे. रस्त्यापुरतीच आमची जागा असून रस्ता खोदला, तरी वाळूतस्कर पुन्हा दुरुस्ती करून वाळूचोरी करीत आहेत.
शासन वनविकासाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करत आहे; परंतू वाळूतस्कर या शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. भीमेत बेसुमार वाळूउपसा होत असल्याने मासेमारी मोठी संकटात आलेली पाहायला मिळत आहे.
वाळूउपसा करण्यासाठी नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या आवाजाने येथील पशुपक्षी स्थलांतरित झालेले पाहायला मिळत आहे.
वाळूमाफिया चक्क भीमा लगतच्या वनक्षेत्रावरच अतिक्रमण करताना दिसत आहेत.