खिळेमुक्त झाडे या अभियानाची झाली चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:24 PM2018-06-10T15:24:18+5:302018-06-10T15:24:18+5:30
झाडांना खिळेमुक्त तसेच वेदना मुक्त करण्याचा विडा पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या तरुणांनी उचलला असून, या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर हाेत अाहे.
पुणे : अंघाेळीची गाेळी या अापल्या संघटनेमार्फत माधव पाटील यांनी सुरु केलेल्या नेल फ्री पेन फ्री ट्री अर्थात खिळेमुक्त झाडे या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर झाले अाहे. चार- पाच तरुणांनी सुरु केलेल्या अभियानात अाता शेकडाे नागरिक सहभागी हाेत अाहेत. पुण्यापासून सुरु झालेले अभियान महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये जाऊन पाेहचले अाहे. दर रविवारी विविध भागातील नागरिक सकाळी हाताेडी घेऊन बाहेर पडतात ते झाडांना मारलेले खिळे काढण्यासाठी. झाडांना खिळेमुक्त करुन त्यांना वेदनामुक्त करण्याचा विडा या अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या कार्यकत्यांनी उचलला अाहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपूर्वी अालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माधव पाटील या पुण्यातील तरुणाने अापल्या मित्रांसाेबत अंघाेळीची गाेळी हे कॅम्पेन सुरु केले. पाणी वाचवण्यासाठी अापण अाठवड्यातून एकदा अंघाेळीची गाेळी घ्यावी म्हणजेच एक दिवस अंघाेळ न करुन ते पाणी वाचवायचे. या कॅम्पेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कॅम्पेनचे पाटील यांनी संघटनेत रुपांतर करुन विविध सामाजिक उपक्रम राबविले. दुष्काळाची दाहकता दाखविणारे फाेटाेंचे प्रदर्शन असाे की मग दुष्काळी भागातील मुलांना पुण्यात अाणून त्यांना मामाच्या गावची सफर असाे. अश्या अनेक उपक्रमांमधून निसर्गासाठी माधव पाटील व त्यांचे सहकारी काम करीत अाहेत. या पुढे जात त्यांनी काही महिन्यांपूर्वी नेल फ्री पेन फ्री ट्री अर्थात खिळेमुक्त झाडे हे अभियान सुरु केले. शहरातील अनेक झाडांवर खिळे मारुन विविध जाहीराती लावल्या जातात. त्याचबराेबर अनेक क्लासेसचे बाेर्डही लावले जातात. झाडांना मारलेले खिळे काढून त्यांना त्रासापासून मुक्त करण्याचा विडा अंघाेळीच्या गाेळीने उचलला अाणि बघता बघता माेठा जनसमुदाय त्यांच्या या अभियानात सहभागी झाला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांपासून ते अायटी कर्मचारी, प्रशासन साऱ्यांनीच या चळवळीत अाता भाग घेतला अाहे.
दर रविवारी शहारातील एक भाग निवडून त्या भागातील झाडांना मारलेले खिळे काढण्यात येतात. या रविवारी काेथरुड येथील सिटी प्राईड सिनेमागृहाच्या परिसरातील झाडांवरील खिळे काढण्यात अाले. या ठिकाणच्या जवळपास 30 झाडांवरील 300 हून अधिक खिळे काढण्यात अाले. झाडांच्या संवेदनांची जाणीव माणूस विसरत चालला अाहे, अापल्याच माणसांनी ठाेकलेल्या खिळ्यांकडे अापणच काणाडाेळा करताे. काेथरुडची झाडे खिळेमुक्त ठेवण्याची जबाबदारी एक पुण्याचा नागरिक म्हणून माझी अाहे. असा निर्धार सकाळी या भागात फिरण्यास अालेल्या गाेगडे यांनी केला.
याविषयी बाेलताना माधव पाटील म्हणाले, अात्तापर्यंत 10 शहरांमध्ये हे अभियान पाेहचले अाहे. अाम्हाला हे अभियान महाराष्ट्रभर न्यायचे अाहे. खिळेमुक्त झाडांबराेबरच झाडांना एक मीटर वासाचा अाळा करण्याचा अामचा प्रयास अाहे. पिंपरीमध्ये हे काम सुरु करण्यात अाले अाहे. या माध्यमातून झाडांना जगण्याचा अधिकार देत अाहाेत. अनेक नवीन साथी या प्रवासात जाेडले गेले अाहेत.