मिळकत कर वसुल करताना राज्यातील महापालिकांच्या नाकी नऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:27 AM2020-12-15T04:27:52+5:302020-12-15T04:27:52+5:30
लक्ष्मण मोरे पुणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींचा सामना राज्यातील महापालिकांनाही करावा लागत असून मिळकत कराची वसुली करण्यात राज्यातील ...
लक्ष्मण मोरे
पुणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींचा सामना राज्यातील महापालिकांनाही करावा लागत असून मिळकत कराची वसुली करण्यात राज्यातील २६ महापालिकांच्या नाकी नऊ आले आहेत. याकाळात १२०० कोटींचा सर्वाधिक मिळकत कर पुणे महापालिकेने गोळा केला आहे. आर्थिक राजधानी मुंबईला पुण्याने यंदा मागे टाकले आहे. आठ महापालिकांचे उत्पन्न २० कोटींच्या आतच असून पाच महापालिकांना एक रुपयाची वसुली करता आलेली नसल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे शासकीय यंत्रणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ऐन मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे नव्या आर्थिक वर्षाला फटका बसला. याला राज्यातील महापालिका अपवाद ठरल्या नाहीत. राज्यामधील महापालिकांचे यंदाचे उत्पन्न पाहिले असता मोठा आर्थिक फटका बसल्याचे आकडेवारीवरुन दिसते आहे. मिळकत कर हाच महापालिकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कोरोनाच्या साथीमुळे नागरिक आर्थिक संकट सापडल्याने अनेकांनी आपले कर अद्याप भरलेले नाहीत. त्यामुळे पालिकांना उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधावे लागत आहेत.
====
चार महापालिकांचे उत्पन्न शून्य
अकोला, उल्हासनगर, जळगाव, परभणी या महापालिकांचे उत्पन्न शून्य आहे. तर, मीरा-भायंदर, अमरावती, मालेगाव, चंद्रपूर पालिका पाच कोटींच्या आतच उत्पन्न मिळवू शकल्या आहेत. तर, औरंगाबाद, भिवंडी, सांगली-कुपवाड, धुळे या पालिका कशाबशा दहा ते वीस कोटींच्या दरम्यान तगल्या आहेत.
====
नोव्हेंबरअखेरीसच्या आकडेवारीनुसार पुणेकरांनी गेल्या आठ महिन्यात तब्बल १२०३ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. मुंबईच्या तुलनेत हा आकडा ६५२ कोटींनी अधिक आहे.
====
पुणेकरांनी कोरोनाच्या काळातही गेल्या आठ महिन्यात तब्बल १२०३ कोटींचा कर जमा केला आहे. यामध्ये सर्वाधिक कर ऑनलाईन पद्धतीने जमा झाला आहे. राज्यातील सर्व महापालिकांकडून प्राप्त झालेल्या आकड्यांनुसार पुणे महापालिका राज्यात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी महापालिका ठरली आहे. अद्यापही कर भरणा सुरु असून आगामी काळात हे उत्पन्न आणखी वाढेल. पलिकेला अभय योजनेचाही मोठा फायदा झाला आहे.
- विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे महापालिका
====
सर्वाधिक मिळकतकर वसुल करणाऱ्या ‘टॉप १०’ महापालिका (आकडे कोटीत)
महापालिका उत्पन्न (नोव्हेंबर अखेर)
पुणे १२०३.६३
मुंबई ५५१.५८
ठाणे २३१.५४
कल्याण-डोंबिवली १९३.६२
पिंपरी-चिंचवड १८२.११
नवी मुंबई १४६.०३
नागपुर ११४.३३
नांदेड ११३.८३
वसई-विरार ७९.९१
नाशिक ५६.५९
सोलापूर ३९.५६