म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनाचा प्रकल्प सुरू- निसर्गप्रेमींचा विरोध; ब्लॉक्स बसवून सिमेंटीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:44+5:302021-03-30T04:07:44+5:30
टेकडीवर बांबू उद्यान, फुलपाखरू उद्यान, घन वन असे उपक्रम राबविले जात आहेत. त्यात आता नक्षत्र वनाचा समावेश झाला आहे. ...
टेकडीवर बांबू उद्यान, फुलपाखरू उद्यान, घन वन असे उपक्रम राबविले जात आहेत. त्यात आता नक्षत्र वनाचा समावेश झाला आहे. म्हातोबा टेकडीवर वन विभागाकडून त्याची सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी २७ नक्षत्रांवर आधारित वृक्ष लावण्यात येणार आहेत. विविध नक्षत्रांच्या आधारावर या ठिकाणी वृक्ष लावण्यात येणार आहेत. प्रत्येकाची एक राशी आणि नक्षत्र असते. त्यानूसार वृक्ष लावून त्याखाली नागरिकांना ध्यान करता येणार आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार म्हणाले, ‘‘नक्षत्र वनात राशीनुसार आणि आकाशातील नक्षत्रानुसार वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्या झाडांच्या खाली नागरिक बसून ध्यान करू शकतील. प्रत्येक व्यक्तीचे वेगळे नक्षत्र असते आणि त्या नक्षत्राचा वृक्ष जो असेल, ते लावण्यात येईल.’’
——————————
रांची शहरात पहिले नक्षत्र वन साकार
देशात नक्षत्र वनाचा उपक्रम झारखंड येथील रांची शहरात साकारण्यात आलेला आहे. रांची शहरातील राजभवनच्या शेजारीच हे उद्यान आहे. त्या ठिकाणी अतिशय सुंदर असे हे नक्षत्र वन उद्यान तयार केले आहे. त्याच धर्तीवर म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वन होत आहे.
—————————-
वन विभागाकडून म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी आखणी झाली असून, ब्लॉक्स बसविण्याचे काम सुरू आहे.
- दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग
—————————
जिम, सिमेंटीकरण टेकडीवर कशाला ?
कोणत्याही टेकडीवर सिमेंटीकरण किंवा इतर सुशोभीकरण करायची गरजच काय ? असा सवाल निसर्गप्रेमींनी विचारला आहे. शहरभर सिमेंट, क्रँक्राटीकरण आहे. त्यामुळे तापमान वाढते. किमान टेकडीवर तरी ते नकोय. टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य तसेच ठेवावे. टेकडीवरील प्राणीजीवन तर आता नष्टच झाले आहे. या सिमेंटीकरणामुळे माणसांची गर्दी वाढून टेकडीचेही शहरीकरण होणार आहे. त्यामुळे टेकडीवर कसलेही विकासकामे करू नयेत, अशी मागणी तिथे फिरायला येणाऱ्यांची आहे. म्हातोबा मंदिरालगत दोन दिवसांपुर्वीच जिमचेे साहित्य मातीत लावली आहेत. त्यामुळेही निसर्गप्रेमी नागरिक नाराज आहेत.
——————————-