नालेसफाई झालीच नाही
By admin | Published: June 22, 2017 06:57 AM2017-06-22T06:57:10+5:302017-06-22T06:57:10+5:30
शहरातील नाल्यांच्या सफाईची पावसाळापूर्व कामे झाली नसल्यावर आणि पूर्वगणनपत्रके फुगविण्यात आल्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नाल्यांच्या सफाईची पावसाळापूर्व कामे झाली नसल्यावर आणि पूर्वगणनपत्रके फुगविण्यात आल्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. क्षेत्रीय स्तरावरील नालेसफाईची कामे, त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत ठेकेदारांच्या कामांची बिले थांबविण्यात येणार असून सदोष पूर्वगणनपत्रके केल्याचे आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
क्षेत्रीय कार्यालयाकडून पावसाळापूर्व कामे निविदा पद्धतीने मागविण्यात आली होती. यामध्ये बहुतांश कामे ही नालासफाईची होती; मात्र पूर्वगणनपत्रके प्रशासनाकडून फुगविण्यात आली होती. तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येणार आहे.
नालेसफाईची कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा, निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नालेसफाईच्या कामांचा अहवाल ठेवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. हा अहवाल फेटाळण्यात आला होता. त्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अविनाश बागवे आणि बाळासाहेब ओसवाल यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. नालेसफाईची निविदा ५० ते ६० टक्के कमी दराने ठेकेदाराने भरली आहे. त्यामध्ये अनामत रक्कम आणि १२ ते १५ टक्क्यांची शासकीय वजावट लक्षात घेता, ६५ ते ७० टक्के दराने ठेकेदाराने काम केले आहे. म्हणजेच अवघ्या ३० ते ३५ टक्के निविदा रकमेत शंभर टक्क्यांचे काम करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.