नालेच सांगणार पुराचा धोका
By admin | Published: June 14, 2015 12:20 AM2015-06-14T00:20:40+5:302015-06-14T03:54:28+5:30
पावसाळ्यात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नाल्यांमध्ये घुसणारे बॅक वॉटर तसेच शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर नाल्यांमध्ये
फ्लो मीटर बसविणार : पाटबंधारे विभागाच्या धर्तीवर नाल्यांवरही महापालिकेचा उपक्रम
सुनील राऊत , पुणे
पावसाळ्यात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नाल्यांमध्ये घुसणारे बॅक वॉटर तसेच शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर नाल्यांमध्ये येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख १३ नाल्यांमध्ये फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे नाल्याची वहनक्षमता, पाण्याचा वेग, किती मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर नाल्यामध्ये किती पाणी आले, त्याचा वेग काय होता, पाण्याची पातळी किती होती अशा प्रकारची सर्व इत्थंभूत माहिती या फ्लो मीटरमुळे प्रशासनास मिळणार आहे. या माहितीच्या आधारावर भविष्यात पूरस्थितीवर उपाययोजना करणे पालिका प्रशासनास सहज शक्य होणार आहे. अशा प्रकारचे फ्लो मीटर पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात बसविण्यात येत असून, याच धर्तीवर महापालिकाही नाल्यांमध्ये असे मीटर बसविणार आहे. त्याची प्रक्रिया प्रशासनाकडून येत्या काही महिन्यांत सुरू करण्यात येणार असून, पुढील वर्षापासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
असा होईल फ्लो मीटरचा फायदा
फ्लो मीटरमुळे नाल्यामध्ये असलेली पाण्याची उंची, पाण्याचा वेग, नाल्याची वहनक्षमता ही आकडेवाडी तत्काळ उपलब्ध होते. हे मीटर नाल्यांमध्ये बसविण्यात आल्यानंतर शहरात कोणत्या भागात किती पाऊस झाल्यानंतर नाल्यामधील पाण्याची स्थिती काय होती, ही माहिती तत्काळ प्रशासनास उपलब्ध होईल. त्यामुळे पहिल्यांदाच पावसाच्या प्रमाणानुसार, नाल्यामध्ये येणारे पाणी, त्या पाण्याची पातळी, त्याचा वेग या माहितीचे विश्लेषण करून पुढील उपाययोजना करणे महापालिकेस सहज शक्य होईल. तसेच या माहितीमुळे कोणत्या भागात किती पाऊस झाल्यानंतर पाणी घुसते, नदीची पातळी वाढल्यानंतर कोणत्या भागात नदीमधून नाल्यात पाणी घुसून पूरजन्य स्थिती उद्भवते हे महापालिकेस निश्चित करता येईल. या माहितीच्या आधारावर नाल्याची खोली वाढविणे , पाणी घुसणाऱ्या भागात नेमक्या उपाययोजना करणे प्रशासनास शक्य होईल.
१३ प्रमुख नाल्यांमध्ये फ्लो मीटर
पावसाळ्यात शहरात निर्माण होणाऱ्या आपात्कालीन स्थितीबाबत महापालिकेने तयार केलेल्या पूर नियंत्रण आराखड्यानुसार, शहरातील प्रमुख १३ नाल्यांच्या परिसरात जोरदार पाऊस अथवा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर नाल्यांना पूर येऊन नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसते. त्यात आंबील ओढा, कर्वेनगर नाला, गुलटेकडी स्वारगेट नाला, कॅन्टोन्मेंट नाला, मुंढवा नाला, फुरसुंगी-हडपसर नाला, पाषाण-बोपोडी नाला, विश्रांतवाडी नाला, गोखलेनगर, फर्ग्युसन नाला या नाल्यांचा समावेश आहे. या प्रमुख नाल्यांच्या परिसरात हे फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत.
लाखो रुपयांच्या
खर्चाची होईल बचत
-नाल्यांमध्ये फ्लो मीटर बसविल्याने महापालिकेकडून नाले सफाईवर केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची बचत तसेच सर्वसामान्यांच्या घरात पाणी घुसल्याने होणारी वित्तहानी टाळणे शक्य होणार आहे.
-सध्या नाल्यांच्या परिसरात येणाऱ्या पुराबाबत पालिकेकडून कोणताही विशेष अभ्यास केला गेलेला नाही. त्यामुळे दरवर्षी केवळ पाणी घुसणाऱ्या परिसरात धोक्याची सूचना देण्यापलीकडे आणि सरसकट सर्व ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्या पलीकडे काहीच केले जात नाही. मात्र, फ्लो मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून सरसकट नाले खोल न करता, केवळ आवश्यकता असलेल्या ठिकाणीच त्यांची रुंदी तसेच खोली निश्चित केली जाईल.
-या शिवाय या परिसरातील नागरिकांना पावसाच्या अंदाजानुसार, धोक्याची सूचना आधीच देऊन त्यांचे स्थलांतर करून पाणी घुसल्याने होणाऱ्या दुर्घटना टाळण्यास मदत होईल.
-पावसाळापूर्व कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. मात्र, रस्ते दुरुस्ती, साफसफाईची
कामे मुदतीत पूर्ण
झालेली नाहीत.
पाटबंधारे विभागाकडून नद्यांसाठी फ्लो मीटर वापरले जातात. याच धर्तीवर महापालिकेकडून नाल्यांसाठी हे मीटर बसविण्यात येतील. त्यामुळे नाल्यांच्या परिसरातील पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षी ही यंत्रणा कार्यरत केली जाईल.
- राजेंद्र जगताप (अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका)