नाव समितीच्या अडचणींत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:27 AM2018-09-01T02:27:25+5:302018-09-01T02:27:53+5:30
प्रस्ताव पक्षनेत्यांकडे : धोरणामुळे राजकीय दबाव
पुणे : महापालिकेच्या नाव समितीसमोरच्या अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. नामकरणाचे काही ठराव समितीसमोर आले असून त्याबाबतचे महापालिकेचे धोरण व प्रत्यक्षात नगरसेवकांची मागणी यात तफावत आहे. त्यातून राजकीय दबाव वाढत असल्याने यावर निर्णय घेण्यासाठी पक्षनेत्यांच्या समितीकडे संबधित ठराव पाठवून देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या कोणत्याही विकासकामाला नाव द्यायचे असल्यास त्यासाठी पक्षनेत्यांनी धोरण ठरवून घेतले आहे. एका प्रभागात ४ नगरसेवक आहेत. त्यापैकी तिघांची संमती असेल तेच नाव अंतीम करण्यात येईल असे धोरण पक्षनेत्यांनी त्यांच्या संयुक्त बैठकीत ठरवले आहे. सर्वपक्षीय गटनेते या बैठकीला उपस्थित असतात व तेच सर्वसंमतीने धोरण ठरवतात. तीन जणांचे मत व तेच नाव असे धोरण मंजूर झालेले धोरण आहे. मात्र काही प्रभागांमध्ये याबाबत अडचण निर्माण झाली आहे. चारपैकी तीन किंवा चारही नगरसेवक भाजपाचे असे ज्या प्रभागांमध्ये आहे तिथे काही अडचण नाही, मात्र तीन राष्ट्रवादीचे एक भाजपाचा अथवा तीन भाजपाचे एक शिवसेनेचा असे काही असेल त्या प्रभागांमध्ये नामकरणाच्या प्रस्तावांबाबत राजकीय अडचणी निर्माण होत आहेत. स्वपक्षाच्या नगरसेवकांकडून राजकीय दबाव, अन्य ज्येष्ठ नगरसेवकांकडून दबाव असे प्रकार होऊ लागले आहेत. त्यावर काय निर्णय करायचा हे नाव समितीत निश्चित होत नसल्याने तो निर्णय पक्षनेत्यांनीच घ्यावा असे सुचवत अडचणीतील प्रस्ताव त्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आहेत.
प्रभाग ३९ व ४१ मध्ये वादाची स्थिती
प्रभाग क्रमांक ३९ मध्ये तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे व एक भाजपाचा असे समीकरण आहे. तेथील एका उद्यानाला नाव देण्याबाबत
भाजपाच्या एका सदस्याने त्यांच्या दिवंगत नेत्याचे नाव सुचवले आहे तर राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी एका राष्ट्रीय महिलेचे नाव द्यावे असा प्रस्ताव दिला आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक ४१ मध्ये तीन भाजपाचे व एक शिवसेनेचा असे आहे. तिथे शिवसेनेच्या सदस्यांने मला ५ वर्षात कोणत्याच कामाला नाव देता येणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रस्तावांचे काय करायचे याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घ्यावा असे सुचवण्यात आले आहे.