फ्लेक्सच्या गुन्ह्यातील नगरसेवकाचे नाव वगळले, राजकीय दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:09 AM2019-03-19T03:09:26+5:302019-03-19T03:09:45+5:30
नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने महपौर चषक कार्यक्रमाचे अनाधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी एका माननीयांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर या माननीयांनी प्रभाग समितीमध्ये राडा केला.
कल्याणीनगर - नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने महपौर चषक कार्यक्रमाचे अनाधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी एका माननीयांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर या माननीयांनी प्रभाग समितीमध्ये राडा केला. इतर माननीयांनी त्यांना साथ दिली. या राजकीय दबाव आणि वरिष्ठांच्या अलिखित आदेशामुळे अनधिकृत फ्लेक्सच्या गुन्ह्यातील माननीयांचे नाव अधिकाऱ्याला वगळावे लागले.
अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये नागरिक चेतना मंचाच्या कनिझ सुकराणी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सुरू आहे. जानेवारीमध्ये उच्च न्यायालयाने अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी काय कारवाई केली, असा जाब पालिकेला विचारला होता. त्यानंतर पालिकेने काही दिवस अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी कारवाईच कडक केली होती.
परिमंडळ १ चे उपायुक्त विजय दहिभाते आणि नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा आयुक्त राजेश बनकर यांनी एका दिवसामध्ये अनधिकृत फ्लेक्स आणि शहर विद्रूपीकरण करणाऱ्या शंभर जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले
होते.
या आदेशानुसार आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास विमाननगर भागामध्ये एका दिवसामध्ये २२ पेक्षा जास्त जणांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अंतर्गत थेट गुन्हे दाखल केले. यादरम्यान महापौर चषक कार्यक्रमाचे अनधिकृत फ्लेक्स विमाननगर-वडगावशेरी या भागांत लावण्यात आले होते. या फ्लेक्सच्या विरोधात कनिझ सुकराणी यांनी पालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाºयांनी आयोजक नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नगरसेवकांनी तक्रारदारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न केला. पण, तक्रारदाराने ऐकले नाही.
अधिका-यांचे कानावर हात
परिमंडळ क्रमांक १ चे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले की, प्रभाग समितीमध्ये नगरसेवकांनी याबाबत विचारले होते. पण याबाबत नंतर बोलू, असं मी सांगितले होते. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आयुक्त राजेश बनकर यांच्याकडे आहे. नगरसेवकांना गुन्ह्यामधून वगळले का याबाबत मला माहीत नाही. या प्रकरणाबाबत नगर रोड-वडगावशेरीचे क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश बनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी नेहमीप्रमाणे संपर्क होऊ शकला नाही.
उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार
उच्च न्यायालयाने अनधिकृत फ्लेक्सवरील ज्यांचे फोटो आहेत. तसेच फ्लेक्स लावणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी माननीयांवर गुन्हा दाखल केला.
मात्र, राजकीय दबावानंतर मांडववाल्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी राजकीय दबावाखाली चुकीचे काम करतात.
अनधिकृत फ्लेक्स प्रकरणाची सुनावणी २५ मार्चला आहे. त्या वेळी हा प्रकार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती नागरिक चेतना मंचाचे कनिझ सुखराणी यांनी दिली .
तेरी भी चूप मेरी भी चूप
त्यानंतर या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये अधिकारी माननीयांवर गुन्हा दाखल कसा करतात. आमच्यावरचा गुन्हा मागे घ्या, असा रेटा लावला. त्यानंतर इतर नगरसेवकांनी त्यांना साथ दिली. या राजकीय दबाव आणि वरिष्ठांच्या अलिखित सूचनामुळे अधिकाºयांनी अनधिकृत फ्लेक्स प्रकरणातील गुन्ह्यातील माननीयांचे नाव वगळून ठेकेदारांच्या नावावर गुन्हा दाखल करा, असे पत्र विमानतळ पोलीस स्टेशनला दिले आहे.
अनधिकृत फ्लेक्सलावल्याप्रकरणी सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होतो. मग नगरसेवकांना सूट का, असा सवाल राजकीय कार्यकर्ते विचारत आहेत.