चित्रपटाच्या नावावरून सोसतोय चटके, ‘एस दुर्गा’मधील अभिनेत्रीची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:03 AM2017-11-17T06:03:09+5:302017-11-17T06:03:16+5:30
धार्मिक विचारसरणीशी काडीमात्र संबंध नसतानाही धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून ‘एस दुर्गा’ हा चित्रपट न पाहताच प्रदर्शनाला विरोध करणे योग्य आहे का?
नम्रता फडणीस
पुणे : धार्मिक विचारसरणीशी काडीमात्र संबंध नसतानाही धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून ‘एस दुर्गा’ हा चित्रपट न पाहताच प्रदर्शनाला विरोध करणे योग्य आहे का? ज्या मुलीचे नाव ‘दुर्गा’ आणि ‘लक्ष्मी’ अशा देवींवरून ठेवले जाते; मग त्यांना काय देवीसारखी वागणूक दिली जाते का? त्या मुलींनाही अत्याचार, त्रासाला सामोरे जावे लागतेच ना! समाजातील ‘दुर्गां’कडे कशा पद्धतीने पाहतो, याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या एका वर्षापासून आम्ही केवळ चित्रपटाच्या नावावरून अनेक चटके सोसत आहोत. ही लढाई अजूनही संपलेली नाही. हा चित्रपट आधी पाहा आणि मगच मतप्रदर्शन करा, असा परखड सल्ला ‘एस दुर्गा’मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने दिला आहे.
गोवा येथे होणाºया ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीने इंडियन पॅनोरमामध्ये ‘एस दुर्गा’ या चित्रपटाची निवड केली होती. मात्र, अचानक या चित्रपटाला वगळण्यात आल्याने सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. ‘लोकमत’शी बोलताना राजश्री म्हणाली, ‘‘जवळपास ५० ते ६० देशांनी ‘सेक्सी दुर्गा’ या नावानेच चित्रपट पाहिला. केवळ भारतातच ‘एस दुर्गा’ असे नामकरण करावे लागले. मामी महोत्सवात हा चित्रपट वगळला. आता इफ्फीमध्येही सेन्सॉरचे प्रमाणपत्र असूनही कात्री लावली. जर महोत्सवात निवड समितीने निवडलेले चित्रपट दाखविले जाणार नसतील तर या समितीची गरजच काय?’’
सगळेच असहाय झाले असल्याचे सांगून राजश्री म्हणाली, ‘‘हा केवळ केरळमधील नव्हे, तर एक वैश्विक विषय आहे. चित्रपटाचा देवी, धर्माशी कोणताही संबंध नाही. चित्रपटातील मुलीचे नाव केवळ ‘दुर्गा’ आहे. नावाबद्दल नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करण्याचा चित्रपटात प्रयत्न करण्यात आला आहे. जे धार्मिक मुद्द्यांपेक्षाही मांडणे जास्त महत्त्वाचे आहे. मुलीचे नाव जरी ‘दुर्गा’ असले, तरी तिच्याकडे देवीच्या भावनेतून पाहिले जाते का? रस्त्यावरून जाणाºया मुलीला ‘सेक्सी’ अशी हाका मारताना तिचे नाव ‘दुर्गा’ असू शकते, हा विचार मनात येत नाही. हाच विरोधाभास पाहायला मिळतो. मग हा विरोध कशासाठी? मी ‘दुर्गा’कडे सक्षम, स्वतंत्र विचार करणारी आणि बिनधास्त म्हणून पाहते.
कदाचित पुढच्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. कुणीतरी तिच्या कपड्यातल्या देहाला पाहत असतो. त्यावर बोलले पाहिजे आणि संवाद साधला गेला पाहिजे. म्हणूनच हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा. हा चित्रपट नक्की काय सांगतो, हे जाणून घ्यायला हवे; म्हणून हा चित्रपट आधी पाहावा मग विरोध दर्शवावा.’’
मूळची औरंगाबादची, शिक्षण पुण्यात
राजश्री देशपांडे ही मूळची औरंगाबादची. पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात तिने शिक्षण घेतले. त्यानंतर चित्रपटांत काम करण्यासाठी ती मुंबईला गेली. प्रवासाची आवड असल्याने केरळ येथे कथकली शिकण्यासाठी ती गेली होती. तिथे एस दुर्गाच्या दिग्दर्शकांशी तिची भेट झाली. त्यामुळे या चित्रपटात तिला भूमिका मिळाली. मल्याळी येत नाही; पण चित्रपटाला कोणतीही भाषा नसते. त्यामुळे हा चित्रपट करणे शक्य झाले असल्याचे ती म्हणाली.