‘नाव छापले’..पण.... राज ठाकरेंना आमंत्रणच मिळाले नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:15 PM2018-06-25T18:15:53+5:302018-06-25T18:20:04+5:30
कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात ‘त्यांनी ’ आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले...
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव छापले खरे पण त्यांना आमंत्रणच पोहोचले नसल्याने इच्छा असूनही त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही...योग्य समन्वय साधता आला असता तर ते येऊ शकले असते , असा राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीबददल खुलासा करत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले...
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा विशेष उपस्थितीमध्ये ‘नाटयसंमेलनाध्यक्ष’असा उल्लेख न करता नांदी: कीर्ती शिलेदार आणि सहकारी’असा करण्यात आल्याने आयोजकांनी यापूर्वीच कीर्तीताईंचा रोष ओढवून घेतला होता. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने या कार्यक्रमाला त्यांनी गैरहजेरी लावली. यातच भर म्हणून की काय? राज ठाकरे यांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव छापले पण त्यांना आमंत्रणच पोहोचले नसल्याने ते उद्घाटनाला येऊ शकले नाहीत असा गौप्यस्फोट आगाशे यांनी केल्याने आयोजकांचे ढिसाळ नियोजन उघडे पडले. आगाशे म्हणाले, पत्रिकेमध्ये राज ठाकरे यांचे नाव छापले आहे. मात्र, ते नाव छापूनही ते का येऊ शकले नाहीत याबाबत रसिकांचा गैरसमज होऊ नये म्हणून राज यानेच मला हा खुलासा करायला सांगितला आहे. या कार्यक्रमाला यायची त्याची खूप इच्छा होती. परंतु, त्याच्यापर्यंत आमंत्रणच पोहोचले नाही. तो कलेचा प्रेमी आहे. आयोजकांनी योग्य समन्वय साधला असता तर कदाचित तो आला असता. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कान टोचले.