पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:47+5:302021-08-19T04:14:47+5:30
पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारख्या देदीप्यमान व्यक्तीचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला द्यावे. नव्याने होणाऱ्या मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब ...
पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारख्या देदीप्यमान व्यक्तीचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला द्यावे. नव्याने होणाऱ्या मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे. शनिवारवाड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने निधी द्यावा. तसेच, शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे ३-४ महिन्यांत पूर्ण करावी, अशी मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांसह बाजीराव पेशवे यांच्या वारसदारांनी केली आहे.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, संदीप खर्डेकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्याचे वंशज श्रीमंत उदयसिंहजी पेशवा आणि कुटुंबीय, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, उदय गांगल, श्रीकांत नगरकर, उमेश देशमुख उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापर्यंत जाता येत नाही, ही शोकांतिका आहे. अनेकदा मागणी करूनही येथे जिना उभारण्यात आला नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरित जिना उभारावा. तसेच शनिवारवाड्याच्या अंतर्गत सुधारणेसाठी केंद्र सरकार, पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.’
भूषण गोखले म्हणाले, ‘पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी शनिवारवाड्यासह शहराच्या इतर भागांमध्ये देखील साजरी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात पेशव्यांचे कार्य पोहोचावे, यादृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार असून तरुणाई देखील सहभागी होणार आहे.’
मोहन शेटे म्हणाले, ‘थोरले बाजीराव पेशवे हे ४८ पेक्षा जास्त लढाई जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्याकाळी मराठ्यांनी पानिपतमध्ये रक्त सांडले म्हणून आजचा हिंदुस्थान आपल्याला पाहायला मिळत आहे.’