कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास शाहु महाराजांचे नाव द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 09:44 PM2018-07-28T21:44:45+5:302018-07-28T21:45:35+5:30
पुण्यात छत्रपती शाहु महाराज यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना भाजपचे आमदार व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करत आहेत.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीने ठराव करुन कसबा पेठ कुंभारवाडा ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास राजर्षी छत्रपती शाहु महाराज सेतु असे नाव द्यावे,अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्याकरिता त्या पुलावर ब्रिगेडच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
शाहु महाराज सेतु यांचे नाव देण्याचा ठराव पुलाचे काम सुरु केले. त्यावेळी मंजूर करण्यात आले आहे. मात्र स्थानिक पुढारी, आमदार पुलाच्या नामकरणाला विरोध करीत असून त्या पुलाचे नाव जाणीवपूर्वक बदलुन दुसरे नाव ठेवण्याचा आग्रह धरत आहेत. त्याला ब्रिगेडच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्रात राजर्षी छतपती शाहु महाराज हे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या समता, समानता, बंधुता या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा जागर सातत्याने होत असतो. पुण्यात छत्रपती शाहु महाराज यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना भाजपचे आमदार विजय काळे व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करीत आहेत. नाव समितीत मंजूर होवून देखील त्यास भाजप आमदार विरोध करीत असून त्यांनी शाहु महाराजांच्या नावाऐवजी संत गोरोबा कुंभार यांचे नाव देण्याचे पत्र पालिकेला दिले आहे.
संत गोरोबा काका कुंभार यांच्या नावाला ब्रिगेडचा विरोध नसून स्थानिक राजकारण्यांकडून होणा-या नाव बदलण्याच्या राजकारणाला विरोध असल्याचे ब्रिगेडने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.छत्रपती शाहु महाराज सेतु यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करुन पैसे उपलब्ध करुन दिले असताना काळे यांनी ते नाव बदलु नये. अन्यथा ब्रिगेडच्यावतीने तीव आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, महेंद्र जाधव, मंदार बहिरट, सचिन जोशी, संजय चव्हाण आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.