कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:12 PM2021-11-11T14:12:10+5:302021-11-11T14:20:28+5:30
कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.
पाषाण : मतदार यादी मध्ये फोटो नसल्याच्या कारणावरून कोथरुड मतदारसंघातील सुमारे 43 हजार 675 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या (210) निवडणूक कार्यालयाच्या वतीने सदर नागरिकांचे फोटो जोडण्याबाबत नोटीस पाठवण्यात आले आहेत.
कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. फोटो सादर न केल्यास नाव मतदार यादीतून वगळनेबाबत निवडणूक आयोग विचार करत असून फोटो नसलेल्या नागरिकांना फोटो सादर करण्याचे आवाहन देखील नोटीसद्वारे करण्यात आले आहे.
एकुण मतदार संख्या दहा टक्के एवढ्या मतदारांचे अध्याप फोटो उपलब्ध नसल्याची माहिती कोथरूड मतदार संघाचे अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप खलाटे यांनी दिली. तसेच मतदार यादी अधिकृत मतदार संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी पाहणी करून मतदार फोटो सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.