अवसरी बुद्रुक येथे मतदार यादीतून नावे गहाळ
By admin | Published: February 22, 2017 02:06 AM2017-02-22T02:06:03+5:302017-02-22T02:06:03+5:30
मंचर-अवसरी जिल्हा परिषद गटातील अवसरी खुर्द व अवसरी-पारगाव गटातील अवसरी बुद्रुक येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती
अवसरी : मंचर-अवसरी जिल्हा परिषद गटातील अवसरी खुर्द व अवसरी-पारगाव गटातील अवसरी बुद्रुक येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगाच रांगा लावल्या होत्या. तर, काही गावांतील मतदार यादीतून मतदारांची नावे गायब झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
अवसरी-पारगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील व शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यात अटी-तटीची लढत असल्याने या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवारी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी वाडी-वस्तीवर मतदार आणण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती. मतदान झाल्यानंतर, मतदारांना चिवडालाडू, वडापाव अशी नाष्टाची सोय क रण्यात आली होती. अवसरी बुद्रुक येथील मतदान केद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदारांचा मोठा उत्साह जाणवत होता. अवसरी खुर्द येथेही सकाळी मतदारांची सकाळी गर्दी कमी होती. दुपारी १२ वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. मात्र, चालू मतदान यादीतून अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने कार्यकर्ते, मतदारांना नावे शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. तर, मतदार यादीत फोटो एकाचा व नावे दुसऱ्याची अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी तालुक्यातील सर्व मतदान केंद्राला भेटी दिल्या. अवसरी खुर्द येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत जेवणाची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)