अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:09 PM2022-10-12T17:09:31+5:302022-10-12T17:13:31+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार
पुणे: वर्ध्याला होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी- विनोबा विचारांशी नाळ असलेल्या साहित्यिकांची निवड केली जावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार- साहित्यिक सुरेश द्वादशीवार, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांची नावे सुचविली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी (दि. १५) होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेने द्वादशीवार यांच्यासह ‘बारोमास’ कार सदानंद देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक व निग्रो साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे ही तीन नावे सुचवली आहेत. साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीनंतर गेल्या चार वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक टाळून एकमताने बिनविरोध निवड केली जात आहे. घटना दुरुस्तीनंतर पहिल्या वर्षी हा बहुमान प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला होता. त्यानंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचविलेल्या नावांची अध्यक्षपदी निवड झाली होती. ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे हे विद्यमान संमेलनाध्यक्ष आहेत.