नमिश हूड, काव्या देशमुख यांना विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:58+5:302021-03-05T04:10:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आणि केपीआयटी यांच्या संलग्नतेने बारा वर्षांखालील मुले व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आणि केपीआयटी यांच्या संलग्नतेने बारा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या देशमुख हिने, तर मुलांच्या गटात नमिश हूड यांनी विजेतेपद पटकावले.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित काव्या देशमुखने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित ध्रुवा मानेचा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. काव्या ही डीवाय पाटील शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून पीसीएमसी कोर्ट, आकुर्डी येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे यंदाचे या गटातील दुसरे विजेतेपद आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकित नमिश हूडने रोहन बजाजचा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. नमिश हा डिएव्ही पब्लिक शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून आरएनडी कॉलनीमध्ये प्रशिक्षक अविनाश हूड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य फेरी :
मुले :
नमिश हूड (४) वि.वि. समिहन देशमुख (१) ७-१;
रोहन बजाज पुढे चाल वि. वैष्णव रानवडे (५);
अंतिम फेरी : नमिश हूड (४) वि.वि. रोहन बजाज ४-१, ४-१;
मुली : उपांत्य फेरी :
काव्या देशमुख (१) वि.वि. माहिका रेगे ७-४;
ध्रुवा माने (२) वि.वि. स्वरा जावळे (३) ७-४;
अंतिम फेरी : काव्या देशमुख (१) वि.वि. ध्रुवा माने (२) ४-०, ४-१.