ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सेनानी नाना जोशी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 08:35 PM2020-09-19T20:35:48+5:302020-09-19T20:36:14+5:30
विद्यापीठ व शिक्षण क्षेत्रातील एक तडफदार आणि वादळी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे माजी सदस्य , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सेनानी एन.सी.जोशी उर्फ नाना जोशी यांचे शनिवारी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक वादळी व्यक्तिमत्व हरपले,अशा भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.
विद्यापीठ व शिक्षण क्षेत्रातील एक तडफदार आणि वादळी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता, कार्यकारिणी सदस्य,अधिसभा व विद्या परिषदेचे आदी अधिकार मंडळांचे सदस्य होते. त्यांनी १९७५ ते १९९६ पर्यंत विद्यापीठात विविध पदावर काम केले. विद्यापीठातील शैक्षणिक क्षेत्रात नाना जोशी आणि सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार यांचे असे दोन गट होते. धुळे,जळगाव जिल्ह्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इतरही जिल्ह्यातील प्राध्यापकांना व संस्थाचालकांनी त्यांनी मदत केली.जोशी यांनी १९५६ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली.
डॉ. शा.ब. मुजुमदार म्हणाले,विद्यापीठ कार्यकारणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात.त्यात नाना जोशी यांचा व माझा एक गट होता.आमच्यात वैयक्तिक मनभेद किंवा नव्हते.तर महाविद्यालयांना मान्यता देताना शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवर मतभेद होते.त्यांनी अनेक प्राध्यापकांना मदत केली.तसेच ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू करण्यास मदत केली.शिक्षण क्षेत्रातील एक कार्यक्षम व्यक्तिमत्व हरपले.
डॉ.सुहास परचुरे म्हणाले,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुमारे पाच कुलगुरूंबरोबर त्यांनी काम केले.माझ्यासह अनेकांना नाना जोशी यांच्यामुळे विद्यापीठात अनेक वर्षे काम करता आले. सर्वांना मदत करत असल्यामुळे ‘मदतीचा राजा’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ग्रामीण भागात अनेक महाविद्यालय सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली. विद्यापीठाच्या कट्ट्यावर बसून ते अनेक कामे करत. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू आणि वादळी व्यक्तिमत्व हरपले आहे.