पुण्यातील नाना पेठेत दुचाकीस्वार गाडीसकट थेट टोईंग व्हॅनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 01:38 PM2021-08-20T13:38:54+5:302021-08-20T13:39:18+5:30
कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी चालकासह टोईंग केले आहे
पुणे : पुण्यातील नाना पेठेत एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घडली आहे.
साहेब, माझी गाडी नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटांसाठी रस्त्यालगत गाडीवरच थांबलेलो आहे, मी गाडी पार्किंग केलेलीच नाही, मी लगेचच येथून जातो, कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी चालकासह टोईंग केले आहे .
रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन वाहतूक विभागाकडून तयार करण्यात येतात. या नो पोर्किंग परिसरात गाडी उभी असल्यास वाहतूक पोलीस टोईंग करतात आणि दंड वसूल करतात. मात्र, पुण्यातून आता एक अजब प्रकार समोर आला आहे. नो पार्किंगमधील बाईक वाहतूक पोलिसांनी थेट चालकासह टोईंग केले आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना अडवण्याचे प्रकार
वाहतूक पोलिसांची तालिबानी पध्दतीने चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्या चाकरमान्या दुचाकीस्वारांना अडवण्याचे प्रकार सुरू आहेत. काही न काही कारणे सांगून वाहने अडविणे, त्यांच्याकडून वसुली करणे, हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत आहेत.