काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नानांनी फटकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:02+5:302021-03-18T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार नसेल तर कारवाई करावी लागेल,” या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि. १६) पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फटकावले.
मुंबईत गांधीभवनमध्ये पटोले यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. पुण्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुमचे वागणेच याला कारणीभूत आहे,” असे खडसावले. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार अनंत गाडगीळ, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पालिकेतील गटनेते आबा बागूल, सर्व कॉंग्रेस नगरसेवक तसेच प्रदेश कार्यकारिणीचे पुण्यातील सर्व पदाधिकारी असे शंभरपेक्षा जास्त काँग्रेसजन या बैठकीला उपस्थित होते.
“लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत कुठेही पक्षाला गेल्या दहा वर्षांत यश मिळालेले नाही. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो सगळा ढासळला आहे. महापालिकेतील अठ्ठावीस नगरसेवकांची संख्या नऊवर आली. लोकसभा, विधानसभा सगळीकडे दारूण पराभव झाला. इतके होऊनही बेदिली माजलेलीच आहे. कोणीही सरळपणे पक्षाचे काम करत नाही. पायात पाय तरी किती घालणार,” असा प्रश्न पटोले यांनी केल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेच्या निडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभाग नेमून दिले जातील. आतापासूनच काम सुरू करा. त्या प्रभागातील पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडत नाही असे लक्षात आले तर तत्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही पटोले यांनी दिला.
शहराध्यक्ष बागवे यांनी त्यांना शहरातील सध्य राजकीय स्थितीची माहिती पटोलेंना दिली. प्रभाग रचना तसेच महापालिकेशी संबधित अन्य गोष्टींमध्ये पक्षाची मुंबईतून मदत लागेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले.
चौकट
शहराध्यक्ष बदलावर चर्चा नाही
शहराध्यक्ष बदलण्याच्या महत्वाच्या विषयावर पटोलेंच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेतल्याने दोन पदे त्यांच्याकडे ठेवली जाणार नाही, असा कयास बांधून शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. मात्र पटोले यांनी हा विषयच चर्चेला न घेतल्याने त्यांची निराशा झाली.