शिक्षण क्षेत्रातील नंदादीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:21+5:302021-03-18T04:12:21+5:30
समाजातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ११० वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ ...
समाजातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ११० वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आजवर हजारो विद्यार्थ्यांना घडवले. याच महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून (दि. १६) सुरु झाला. यानिमित्ताने घेतलेला आढावा...
- डॉ. श्रीपाद पांडुरंग जोशी, पुणे.
१९०९ मध्ये अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना बाळूकाका कानिटकर व सहकाऱ्यांनी केली. कुलगुरू म्हणून दादासाहेब केतकरही दाखल झाले. दानशूरांच्या देणग्या आणि घरोघर माधुकरी मागून भोजन या स्वरुपात दैनंदिन शिक्षण सुरू होते. आश्रमात ग. श्री. खैर व नानासाहेब परुळेकर ही मुलेही शिक्षण घेत होती. खैर आणि परुळेकर या दोघांचे बीए झाल्यावर कुलगुरू दादांनी त्यांना विचारले, तुम्ही पुढे काय करणार? त्यावर त्यांनी आम्ही संस्थेची शाळा सुरू करणार? असून, देणग्या व अल्प वेतनावर काम करणारे सहकारी मिळवू, असे उत्तर दिले.
खैर व परुळेकर यांनी दादासाहेब केतकरांच्या आशीर्वादाने जून १९२१ ला सदाशिव पेठेतील आश्रमाच्या चार खोल्यांत संस्थेची महाराष्ट्र विद्यालय नावाची शाळा सुरू केली. खैर व परुळेकर यांचे समविचारी मित्र विनावेतन काम करण्यास येऊ लागले. देशभक्ती, कर्तव्यदक्षता, शरीरसंवर्धनपूरक व्यायाम, ज्ञानार्जन या सद्गुणांच्या शिक्षणामुळे शाळेची ख्याती वाढू लागली.
उच्च शिक्षणासाठी खैर अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठातून एमए, तर न्यूयॉर्क विद्यापीठातून पीएचडी घेतली. परतल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्यात वाहून घेतले. हस्तलिखित प्रबंधलेखन, अंकलेखन, वक्तृत्व, वृत्तपत्र बनवणे असे कितीतरी उपक्रम. त्यात यश संपादन करणाऱ्यांना बक्षिसेही दिली जात.
१२ जुलै १९६१ रोजी सकाळी विद्यार्थ्यांना श्रीराम मंदिरापुढे अचानक बोलावण्यात आले. मुलांपुढे पर्यवेक्षक वा. रा. शिदोरे, आश्रम व्यवस्थापक म. बा. नाईक आले. त्यांनी पानशेत धरण पहाटे फुटल्याचे सांगितले. मुळा-मुठा नद्यांना पूर आलेला आहे. तरी गावातील मुलांनी तातडीने घर गाठावे, असे सांगितले. एकच गोंधळ उडाला. माझे शासकीय वसतिगृह स्टेशनकडे होते. आम्ही स्वारगेटमार्गे पळत सुटलो. दुसऱ्या दिवशी पूरग्रस्त लोकांनी आमच्या शाळेत आश्रय घेतला होता. आश्रमातील मुले त्यांना भोजन वाटत होती.
१९२१ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ खैर शाळेचे, संस्थेचे नेतृत्व करीत होते. १९३५ साली मुंबईचे शिक्षणमंत्री रँ. र. पु. परांजपे यांनी शाळेला भेट दिली. शालेय उपक्रम समजून घेतले. त्यांनी पुढील अभिप्राय लिहिला. तो असा होता, मला विश्वास आहे की, शिक्षण खाते या संस्थेचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन तेथील काही उपक्रम शिक्षणपद्धतीत राबवेल.
खैर यांनी संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली. या संघटनेला ५५ वर्षे झाली आहेत. १२ मे रोजी जास्तीत जास्त माजी विद्यार्थी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र जमतो. आमची संस्था, शाळा दरसाल एका आदर्श माजी विद्यार्थ्याचा गौरव करते. ‘मासिक समाचार’ हे संस्थेचे मुखपत्र दरमहा विद्यार्थ्यांना पाठविले जाते. माजी विद्यार्थ्यांशी स्नेहाचे नाते जपणाऱ्या शाळेचा आणि संस्थेचा आम्हाला नित्य अभिमान वाटतो. महाराष्ट्र विद्यालय ही शाळा शिक्षण क्षेत्रातील नंदादीप आहे. अशा या माझ्या शाळामातेला मी विनम्र अभिवादन करतो.
(लेखक शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ साहित्यिक आहेत)