राजकीय फ्लेक्स काढण्यावरून नानगाव राष्ट्रवादीत कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:39+5:302021-09-19T04:12:39+5:30
केडगाव : नानगाव तालुका दौंड येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे यांच्या निवडीचा फ्लेक्स लावण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राजकीय ...
केडगाव : नानगाव तालुका दौंड येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे यांच्या निवडीचा फ्लेक्स लावण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. यावरून फ्लेक्स काढणाऱ्या विरोधात आश्लेषा शेलार यांनी तक्रार दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर हकीकत अशी की, भारती शेवाळे यांची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवड झाल्याबद्दल नानगाव येथील राष्ट्रवादी युवती महिला कार्याध्यक्षा आश्लेषा नंदकिशोर शेलार यांनी अभिनंदनाचा फ्लेक्स लावला होता. हा फ्लेक्स जुन्या नानगाव ग्रामपंचायत इमारतीवर लावला होता. नानगाव ग्रामपंचायतीवर भाजप व राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा फ्लेक्स लावताच अवघ्या दहा मिनिटांमध्ये शिपाई मच्छिंद्र दादासो अडागळे यांच्या मदतीने फ्लेक्स काढून टाकला. यावरून राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष आश्लेषा शेलार आक्रमक झाल्या असून त्यांनी शिपाई अडागळे यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच आश्लेषा शेलार यांनी हा फ्लेक्स परत लावण्यास परवानगी मिळावी यासंदर्भात यवत पोलीस स्टेशनला अर्ज केला आहे. यानंतर यवत पोलीस स्टेशन आश्लेषा शेलार यांना ग्रामपंचायत नानगाव परवानगी घेऊनच इतर जाचक अटींसह फ्लेक्स लावण्यास परवानगी दिली आहे.
--
चौकट
खरेतर गावांमध्ये राष्ट्रवादी व भाजपचे दोन्ही गटाचे सर्व फ्लेक्स लावले जातात; परंतु या निवडीचा फ्लेक्स विनापरवानगी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीवर जाणूनबुजून लावण्यात आला. भारती शेवाळे या राष्ट्रवादीच्या नेत्या असल्याने आम्हाला आनंद आहेच; परंतु फ्लेक्स लावण्याची जागा चुकली. या इमारतीमध्ये आमचे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड, भजनी मंडळाचे कार्यालय व पोस्ट ऑफिस कार्यालय आहे या फ्लेक्समुळे या कार्यालयांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ग्रामपंचायत इमारतीवरील फ्लेक्स काढला आहे.
-संदीप पाटील खळदकर,
उपसरपंच,
--
फ्लेक्स काढण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आम्हाला समज द्यायला हवी होती. प्रत्यक्षात आम्ही दोन्ही राष्ट्रवादीचे गट आहोत; परंतु कुरघोडीच्या राजकारणातून हा फ्लेक्स काढण्यात आला. यापूर्वी अनेकदा माझे फ्लेक्स काढण्यात आले आहेत. यामुळेच मी फ्लेक्स काढणाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
आश्लेषा शेलार, तक्रारदार.