देवदूत रिक्षाचालकाच्या सतर्कतेने नराधम गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:01+5:302021-09-10T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १३ जणांनी पाशवी बलात्कार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १३ जणांनी पाशवी बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असताना गुरुवारी पहाटे पुन्हा एका रिक्षाचालकाने ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार घडला. मात्र, त्याचवेळी एका देवदूतासारख्या धावून आलेल्या एका रिक्षाचालकाने ६ वर्षांच्या मुलीला पळवून नेताना पाहिले आणि त्याने घटनेचे गांभीर्य ओळखत केलेल्या प्रयत्नांमुळे ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तो नराधम रिक्षाचालक काही तासांत गजाआड होऊ शकला.
एस टी बसस्थानकासमोरील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील आईच्या कुशीतून एका रिक्षाचालकाने मुलीला उचलून मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या रिक्षात ठेवले. ही बाब रस्त्याच्या दुसऱ्र्या बाजूला असलेल्या एका रिक्षाचालकाने पाहिली. त्याला हा प्रकार काहीतरी वेगळा वाटला. नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे त्याला त्यातील गांभीर्य लक्षात आले. त्याने त्याचा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पाठलाग केला. मात्र, चौकात वळसा घालून येईपर्यंत तो फरार झाला होता. तेव्हा तो पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन त्याने या कुटुंबाला उठविले. आपली मुलगी दिसत नसल्याचे पाहिल्यावर हे कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी तातडीने परिसरातील सर्व पोलिसांना याची माहिती दिली. स्टेशन परिसरात रात्रगस्तीवर असलेले पोलिसांचे पथक काही मिनिटात तेथे पोहोचले. रिक्षाचालकाने मुलीचे अपहरण केलेल्या रिक्षाचा क्रमांक पाहिला होता. तोपर्यंत संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. रिक्षाक्रमांकावर रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा या या रिक्षाचा मालक कोंढव्यात असल्याची माहिती मिळाली. त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ही रिक्षा दुसऱ्र्या एकाला चालवायला दिल्याची माहिती पुढे आली. त्याने ती दुसऱ्र्याला भाड्याने दिल्याचे सांगितले. दुसऱ्र्याने ती तिसऱ्र्याला भाड्याने दिली होती. त्यातून तिसरा व्यक्ती हा मांढरे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तो रिक्षा लावत असलेल्या ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा तो मार्केट यार्ड येथील सोमशंकर चेंबर्स येथे रिक्षा लावत असल्याचे समजले. पोलीस तातडीने तेथे पोहचले. तेव्हा तेथे खाली त्याची रिक्षा दिसून आली. या व्यावसायिक इमारतीत शोध घेतल्यावर तो मुलीसह आढळून आला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन त्याला पकडले. ही सर्व शोधाशोध सुमारे तीन ते साडेतीन तास सुरु होते.
........
एका रिक्षाचालक ६ वर्षांच्या मुलीला उचलून नेत असल्याचे दुसऱ्या रिक्षाचालकाने पाहून तातडीने ही बाब त्या कुटुंबाला सांगितली. त्यामुळे पोलिसांपर्यंत ही माहिती लगेच मिळाल्याने पोलिसांनी तातडीने हालचाल करून या मुलीचा शोध घेता आला. नाहीतर हे कुटुंब जागे झाल्यानंतर त्यांना मुलगी नसल्याचे समजले असते. मात्र, देवदूतासारखा धावून आलेल्या या रिक्षाचालकामुळे रात्रीच हा प्रकार उघडकीस आला.
सागर पाटील, पोलीस उपायुक्त.