नारायणगावला कडकडीत बंद

By admin | Published: April 10, 2017 01:58 AM2017-04-10T01:58:46+5:302017-04-10T01:58:46+5:30

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी़, डॉ़ स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी

Narayanagawa cracked off | नारायणगावला कडकडीत बंद

नारायणगावला कडकडीत बंद

Next

नारायणगाव : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी़, डॉ़ स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नारायणगाव, वारुळवाडी, खोडद या गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळून सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला़ संघटनेच्या माध्यमातून नारायणगाव येथे कामबंद आंदोलन, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी विविध मागण्या सादर केल्या़ दरम्यान, रास्ता रोको व मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. तसेच, ट्रॅक्टर व औजारे घेऊन नारायणगाव शहरातून रॅलीद्वारे आंदोलन केले़
कुरेशी मार्केट येथे झालेल्या निषेध व संपाच्या सभेत बोलताना अतुल बेनके म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रक्कम नाही; परंतु पक्षाच्या जाहिराती करण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत़ शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही़ शेतकरी जगला काय, मेला काय, या शासनाला त्याचे घेणेदेणे नाही. जर कर्जमाफी झाली नाही, तर पुढील आंदोलन हे तीव्र असेल याची नोंद शासनाने घ्यावी़ शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे़
आशाताई बुचके म्हणाल्या की, शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, सर्वच पक्षाने कर्जमाफीचा जोर लावत असताना शासन बघ्याची भूमिका घेत आहे़ उत्तर प्रदेशामध्ये भाजपा सरकार कर्जमाफी देते, परंतु महाराष्ट्रात कर्जमाफी देत नाही, असा दुजाभाव करणाऱ्या भाजपा सरकारला शेतकरी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही़ माऊली खंडागळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेद्वारे सादर केली़. याला उपस्थितांनी दाद दिली.़ याप्रसंगी विनायक मोरे, रोहिदास भोर, सोमनाथ शिंदे, सतीश पाटे, सोपान खैरे, राजू गावडे, जितेंद्र बिडवई, श्रीकांत वायकर, गणेश भोर, योगेश पाटे आदी शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त करून विविध मागण्या सादर केल्या़ उपस्थित शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़
या वेळी शेतकऱ्यांच्या व्यथा असलेले निवेदन तहसीलदार आशा होळकर यांना सादर केले़ या वेळी मंडलाधिकारी योगेश पाडळे, तलाठी नितीन चौरे उपस्थित होते.

नारायणगाव शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला तीनही गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, सर्व व्यापाऱ्यांसह हॉटेलचालक, भाजी व्यावसायिक यांनी कडकडीत असा बंद पाळला़ दिवसभर दुकाने बंद होती. किसान क्रांती मोर्चा जुन्नर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांनी आपली शेती उपयोगी औजारे व टॅ्रक्टर घेऊन रॅली काढून आपल्या मागण्या सादर केल्या़ या रॅलीमध्ये शंभर टॅ्रक्टर सहभागी झाले होते़ शेतकऱ्यांनी बैलगाडीतून रॅलीद्वारे काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

Web Title: Narayanagawa cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.